धुळे : धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी धुळे जिल्ह्यात भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. मल्हार योद्धा दीपक बोराडे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या महाएल्गार मोर्चात हजारोंच्या संख्येने धनगर समाजबांधव सहभागी झाले होते. या मोर्चामुळे संपूर्ण धुळे शहर पिवळ्या झेंड्यांनी आणि धनगर समाजाच्या पारंपरिक वेशभूषेने लक्षवेधी ठरले.मोर्चात तरुण, युवती, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
धनगर समाजाची पारंपरिक वाद्ये असलेले डफ, संबळ आणि इतर वाद्यांच्या गजरात मोर्चा पुढे सरकत होता. सहभागी बांधवांच्या हातात पिवळे झेंडे आणि विविध मागण्यांचे फलक दिसून येत होते. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या समाजबांधवांमुळे मोर्चाला विशेष स्वरूप प्राप्त झाले.
छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
महामोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर धनगर समाजाच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीच्या मागणीसाठी मोर्चाला सुरुवात झाली. ग्रामीण भागातील धनगर बांधवांनी मोर्चात सहभागी होण्यासाठी ट्रॅक्टर आणि मोटारसायकलींचा वापर केला. विविध गावांमधून समाजबांधव मोठ्या संख्येने धुळ्यात दाखल झाले होते. मोर्चात सहभागी झालेल्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीला गती देण्यासाठी आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या महामोर्चातून समाजाच्या एकजुटीचे दर्शन घडले. एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीची मागणी हा या महामोर्चाचा प्रमुख मुद्दा राहिला.

