Explore

Search

October 24, 2026 4:54 pm

चुकीचा फोन लागल्याच्या कारणावरून दोघांकडून बाप-लेकाला बेदम मारहाण; शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल !

इचलकरंजी : चुकीने फोन लागल्याच्या कारणावरून वाद घालून दोघांनी मिळून बाप-लेकाला बांबूच्या काठीने आणि हातातील कड्याने जबर मारहाण केल्याची घटना इचलकरंजी येथील स्टेशन रोडवरील हॉटेल सोनालीसमोर घडली आहे. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्ञानदेव दगडू डोंगरे (वय ५५, रा. बुगड, खानावळ, जवाहरनगर, इचलकरंजी) हे १७ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास आपल्या आईला फोन करत होते. त्यावेळी चुकून त्यांचा फोन आरोपी क्र. १ च्या मानलेल्या बहिणीला लागला. याचा राग धरून आरोपींनी ज्ञानदेव यांना फोन करून ‘तुम्ही एका महिलेला फोन का केला?’ असा जाब विचारत त्यांचे ठिकाण विचारले.

ज्ञानदेव यांनी ते डेक्कन मिल कंपाऊंडजवळ, सुरेश देसाई यांच्या पान शॉपजवळ असल्याचे सांगताच आरोपी गणेश महादेव कुंभार (वय २४, रा. गणेशनगर, शहापूर) आणि नागराज भिम्मन्ना वडर (रा. आझादनगर, शहापूर) हे त्या ठिकाणी आले. त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केल्याने घाबरून ज्ञानदेव यांनी आपला मुलगा रवी याला तेथे बोलावून घेतले.

रवी आरोपींना समजावून सांगत असताना, आरोपी गणेश कुंभार याने तेथे पडलेली बांबूची काठी घेऊन रवीच्या तोंडावर मारली. तर आरोपी नागराज वडर याने हातातील कड्याने मारहाण करून ज्ञानदेव यांच्या ओठावर व डोळ्याखाली मारून त्यांना जखमी केले.

या मारहाणीत फिर्यादी ज्ञानदेव डोंगरे व त्यांचा मुलगा रवी ज्ञानेश्वर डोंगरे हे दोघे जखमी झाले आहेत. आय.जी.एम. हॉस्पिटल, इचलकरंजी येथे उपचार घेतल्यानंतर दिलेल्या जबाबावरून शहापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ११८(१), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कोष्टी (बॅज नं. २१६९) करत आहेत.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर