पाथरी | प्रतिनिधी : पाथरी तालुक्यातील श्री रेणुका शुगर कारखान्यात ऊसदराच्या मागणीवरून शेतकरी आक्रमक झाले आहेत. ऊसाला प्रतिटन ४ हजार २०० रुपये दर मिळावा, या मागणीसाठी सोमवार, दिनांक १९ ऑक्टोबर २०२६ रोजी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्यासमोर धरणे आंदोलन केले. त्यानंतर कारखाना प्रशासनाकडून मागणी मान्य न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी थेट कारखान्याच्या गव्हाणीत बसून आंदोलन केले. या आंदोलनामुळे कारखान्याचे कामकाज बंद करण्यात आले.
शेतकऱ्यांनी यापूर्वीच कारखाना प्रशासनाला निवेदन देऊन ऊसदर जाहीर करण्याची मागणी केली होती. मात्र, कारखाना प्रशासनाने पहिली उचल प्रतिटन ३ हजार रुपये देण्याची भूमिका मांडल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, शेतकऱ्यांची प्रतिटन ४ हजार २०० रुपये दर देण्याची मागणी असल्याने या मुद्द्यावरून संघर्ष निर्माण झाला.
मागणी मान्य होईपर्यंत कारखाना सुरू होऊ देणार नाही…
ऊसदराच्या प्रश्नावर तोडगा न निघाल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन तीव्र केले. कारखान्याच्या गव्हाणीत बसून त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. ऊसाला योग्य भाव मिळाल्याशिवाय कारखाना सुरू होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलक शेतकऱ्यांनी घेतली आहे.
या आंदोलनात कॉम्रेड दीपक लिपने, बळीराम वराडे, ज्ञानेश्वर शिंदे, मधुकर अवचार, आसारामजी वराडे, भागवत इंगळे, ज्ञानेश्वर इंगळे यांच्यासह इतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.
ऊसदराच्या प्रश्नावर कारखाना प्रशासन आणि शेतकरी यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, आता प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

