पंढरपूर | प्रतिनिधी :पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या वयावरून नवा वाद निर्माण झाला आहे. निवडणूक लढवण्यासाठी आवश्यक असलेल्या वयोमर्यादेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला असून, गावडे यांची उमेदवारी रद्द करावी आणि त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी न्यू रासपचे उमेदवार प्रा. राघू तथा आर. वाय. घुटुकडे यांनी दर्शवली आहे. त्यामुळे पुणे शिक्षक मतदारसंघातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच्या अडचणी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवसेनेकडून स्वतंत्र उमेदवार देण्यात आल्यानंतर आता भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या वयावरून नवा राजकीय आणि कायदेशीर वाद समोर आला आहे.
प्रा. आर. वाय. घुटुकडे यांनी केलेल्या आरोपानुसार, मतदार यादीत कौस्तुभ गावडे यांचे वय २९ वर्षे नमूद असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपले वय ३० वर्षे दाखवल्याचा आरोप करण्यात आला आहे. निवडणूक लढवण्यासाठी किमान ३० वर्षे वयाची पात्रता आवश्यक असल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांच्या उमेदवारीच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे.
या प्रकरणी कौस्तुभ गावडे यांच्या उमेदवारीला आव्हान देण्यासाठी कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे प्रा. घुटुकडे यांनी सांगितले आहे. तसेच, निवडणूक आयोगाची फसवणूक केल्याचा आरोप करत गावडे यांची उमेदवारी रद्द करावी आणि त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या आरोपांमुळे पुणे शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणात न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर काय घडामोडी घडतात आणि निवडणूक आयोग याबाबत काय भूमिका घेतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

