Explore

Search

December 25, 2025 9:43 pm

राहुल गांधीमुळे माणिकराव कोकाटे यांना दिलासा ? हायकोर्टात शिक्षेला स्थगिती नाही, मात्र जामिनामुळे अटक टळली !

मुंबई : बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका मिळवल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांच्यावर राजकीय आणि कायदेशीर अशा दोन्ही आघाड्यांवर मोठी कारवाई झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोकाटे यांच्याकडील क्रीडा खाते काढून घेण्यात आले असून त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सादर केला आहे. त्यानंतर क्रीडा खाते स्वतः अजित पवार यांनी आपल्या ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, कोकाटे प्रकरणाची आज मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान कोकाटे यांना ठोठावण्यात आलेल्या दोन वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेला स्थगिती देण्यास न्यायालयाने स्पष्ट नकार दिला. मात्र, न्यायालयाने दिलेल्या दिलशामुळे कोकाटे यांची अटक टळली आहे. अटक वॉरंट जारी करण्यात आले असले तरी अखेर न्यायालयाने एक लाख रुपयांच्या जामिनावर त्यांना जामीन मंजूर केला. सुनावणीदरम्यान न्यायालयाने स्पष्ट शब्दांत सांगितले की, “या प्रकरणात कोणताही अंतरिम दिलासा देण्याचे आदेश देण्यात आलेले नाहीत.” त्यामुळे शिक्षेवर स्थगिती नसल्याचे कोर्टाने अधोरेखित केले.

कोकाटे यांच्यावतीने ज्येष्ठ वकील रविंद्र कदम यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यांनी प्रकरणाची सुरुवातीपासूनची पार्श्वभूमी न्यायालयासमोर मांडली. जुन्या आदेशांतील साक्षीदार असलेल्या पोलीस पाटलांच्या जबाबांचा दाखला देत, 1990 सालच्या कोकाटे यांच्या आर्थिक परिस्थितीचा आणि पुढील काही वर्षांत झालेल्या बदलांचा संदर्भ त्यांनी दिला. आर्थिक परिस्थिती कायमस्वरूपी तशीच राहत नाही, ती बदलत असते, असा मुद्दा त्यांनी ठामपणे मांडला.बनावट कागदपत्रांशी संबंधित कलमांबाबतही सविस्तर युक्तिवाद करण्यात आला. त्याचबरोबर कोकाटे यांच्या प्रकृतीचा मुद्दा उपस्थित करत लीलावती रुग्णालयातील डॉक्टर जलील पारकर यांनी दिलेला वैद्यकीय अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला. सध्या माणिकराव कोकाटे हे लीलावती रुग्णालयातील आयसीयूच्या बेड क्रमांक 9 वर दाखल असून त्यांच्यावर एंजिओप्लास्टी होणार असल्याचा अहवालही कोर्टासमोर ठेवण्यात आला.

या प्रकरणातील युक्तिवादादरम्यान कोकाटे यांच्या वकिलांनी राहुल गांधी आणि खासदार अफजल अन्सारी यांच्या प्रकरणांचा दाखला दिला. अफजल अन्सारी यांना ठोठावण्यात आलेल्या चार वर्षांच्या शिक्षेला यापूर्वी स्थगिती देण्यात आली होती, याकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले. तसेच राहुल गांधी प्रकरणात शिक्षेला स्थगिती मिळाल्याचा संदर्भ देत कोकाटे यांनाही तशीच सवलत द्यावी, अशी मागणी करण्यात आली.मात्र, न्यायालयाने शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला असला तरी जामीन मंजूर केल्यामुळे कोकाटे यांची तुरुंगात रवानगी टळली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात “राहुल गांधींच्या दाखल्यामुळे माणिकराव कोकाटे वाचले” अशी चर्चा रंगू लागली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे माणिकराव कोकाटे यांचे राजकीय भवितव्य आणि कायदेशीर लढाई दोन्ही निर्णायक वळणावर आली असून पुढील सुनावण्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर