Explore

Search

December 25, 2025 6:40 pm

महाराष्ट्रातील 29 महापालिका निवडणुकांचा रणसंग्राम सुरू; आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात !

मुंबई : महानगरपालिकेसह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर आता निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे. आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत असून 30 डिसेंबर ही अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे राज्यातील प्रमुख शहरांमध्ये राजकीय हालचालींना चांगलाच जोर चढला आहे. अनेक ठिकाणी आघाडी आणि युतींबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी किती इच्छुक मैदानात उतरतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

नागपूर महानगरपालिकेसाठीही आजपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. इच्छुक उमेदवारांना 30 डिसेंबरपर्यंत संबंधित झोन कार्यालयात ऑफलाइन पद्धतीने अर्ज दाखल करता येणार आहेत. शहरातील 38 प्रभागांचे दहा झोनमध्ये विभाजन करण्यात आले असून प्रत्येक झोनमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आजपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. राजकीय पक्षांकडून जागावाटप आणि उमेदवार निश्चितीवर चर्चा सुरू असतानाच प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ होत आहे. 30 डिसेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार असून 15 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याची भूमिका भाजपने घेतली आहे. पुणे महापालिकेसाठी प्रभागनिहाय उमेदवार निश्चिती अंतिम टप्प्यात असून शुक्रवारी भाजपची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. ही यादी सुमारे 80 उमेदवारांची असणार असल्याची माहिती पक्षातील नेत्यांनी दिली आहे.

महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू असली तरी अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. जागावाटपात योग्य न्याय मिळाल्यासच एकत्र येण्याची भूमिका घेण्यात येईल, अन्यथा महाविकास आघाडीतील घटक पक्षांसोबत राहण्याचा पर्याय खुला ठेवण्यात आला आहे, अशी माहिती पक्ष सूत्रांकडून मिळाली आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार गेल्या तीन दिवसांपासून पुण्यात मुक्काम करून महापालिका निवडणुकांची तयारी करत आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर आता पक्षप्रवेशाचे कार्यक्रम सुरू झाले आहेत. आजही अनेक इच्छुक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत असून अजित पवार बारामती हॉस्टेलमध्ये सकाळपासून बैठका घेत आहेत.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजप आणि शिंदे गटातील शिवसेना यांच्यातील युती निश्चित झाल्याचा दावा खासदार श्रीरंग बारणे यांनी केला आहे. लवकरच संयुक्त पत्रकार परिषद घेऊन याबाबत अधिकृत घोषणा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या युतीत शिवसेनेने 30 जागांची मागणी केली असून, जागावाटपात तडजोडीची भूमिका घेण्यात येईल, असेही बारणेंनी स्पष्ट केले आहे. अजित पवार गटाकडून अधिक जागांची ऑफर मिळाली तरी भाजपसोबतची पारंपरिक युती कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

 

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर