पुणे : राज्यात महानगरपालिका निवडणुकांचे वारे जोरात वाहू लागले असताना पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) साठी चिंतेची बातमी समोर आली आहे. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र येण्याच्या हालचालींना जगताप यांचा तीव्र विरोध असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
या घडामोडींमुळे शरद पवार गटात अस्वस्थता निर्माण झाली असतानाच खासदार सुप्रिया सुळे यांनी या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, “प्रशांत जगताप यांचा कोणताही राजीनामा माझ्याकडे आलेला नाही. तसेच प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही याबाबत मला कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.” पुढे पक्षातील आघाडीच्या चर्चांवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सध्या विविध पातळ्यांवर चर्चा सुरू आहेत. मात्र, जोपर्यंत यावर अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत याबाबत भाष्य करणं योग्य ठरणार नाही. “पक्षाचा कोणताही निर्णय सर्व नेत्यांना विश्वासात घेऊनच घेतला जाईल. कुणावरही निर्णय लादला जाणार नाही,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
सुप्रिया सुळे यांनी पुढे माहिती देताना सांगितले की, प्रशांत जगताप यांच्यासोबत काल मुंबईत सविस्तर चर्चा झाली आहे. या बैठकीला शशिकांत शिंदे आणि जयंत पाटील हेही उपस्थित होते. “आतापर्यंत कोणत्याही पक्षाकडून आघाडीसाठी अधिकृत प्रस्ताव आलेला नाही. मुंबईतील निवडणुकांसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याशी संवाद सुरू आहे,” असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, आजही प्रशांत जगताप मुंबईत वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असून त्यांच्या नाराजीवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पक्षातील महत्त्वाचा चेहरा असलेल्या जगताप यांनी जर वेगळा निर्णय घेतला, तर त्याचा परिणाम आगामी महानगरपालिका निवडणुकांवर होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
