नाशिक : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या राजकारणात मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. नाशिकचे दोन माजी महापौर विनायक पांडे आणि यतिन वाघ हे लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. यासोबतच काँग्रेसचे दिग्गज नेते आणि नाशिकच्या राजकारणात प्रभावी मानले जाणारे शाहू खैरे हे देखील भाजपाच्या वाटेवर असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे.
या तिन्ही नेत्यांचा भाजप प्रवेश सोहळा राज्याचे जलसंपदा मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार असल्याचे समजते. या प्रवेशामुळे एकाच वेळी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला मोठा राजकीय धक्का बसणार आहे. माजी महापौर विनायक पांडे हे ठाकरे गटातील शिवसेनेचे दिग्गज आणि नाशिक महापालिकेतील प्रभावी नेतृत्व मानले जात होते. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने महापालिकेत महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याचप्रमाणे यतिन वाघ हे देखील नाशिक महापालिकेचे माजी महापौर असून शहरातील स्थानिक राजकारणात त्यांचा चांगलाच प्रभाव आहे. दोन्ही नेत्यांचा भाजपात प्रवेश झाल्यास शहरातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शाहू खैरे यांचा भाजपात प्रवेश हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. दीर्घकाळ काँग्रेसमध्ये सक्रिय असलेले शाहू खैरे हे संघटनात्मक बांधणीसाठी ओळखले जातात. त्यांच्या पक्षबदलामुळे नाशिक जिल्ह्यात काँग्रेसची ताकद कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप गेल्या काही काळापासून नाशिकमध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. महापालिका निवडणुका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने हा प्रवेश भाजपासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. स्थानिक नेतृत्व आणि अनुभवी चेहऱ्यांच्या माध्यमातून भाजप नाशिकमध्ये अधिक बळकट होण्याचा प्रयत्न करत आहे.
दरम्यान, या घडामोडींमुळे ठाकरे गटाच्या शिवसेनेत आणि काँग्रेसमध्ये खळबळ उडाली असून संबंधित पक्षांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, आगामी काळात नाशिकच्या राजकारणात आणखी मोठे बदल पाहायला मिळतील, हे मात्र निश्चित मानले जात आहे.

