पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये आघाडी होण्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये बैठकींचे सत्रही पार पडले होते. मात्र आता ही संभाव्य युती जवळपास संपुष्टात आल्याचे संकेत मिळत आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, जागावाटपाबरोबरच निवडणूक चिन्हावरून दोन्ही पक्षांमध्ये मतभेद निर्माण झाले. अजित पवार गटाने शरद पवार गटाला ‘घड्याळ’ या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने हा प्रस्ताव स्पष्टपणे फेटाळला असून ‘तुतारी’ या चिन्हावरच निवडणूक लढवण्यावर पक्षातील नेते ठाम आहेत. याशिवाय, अधिक जागांची मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आल्यानेही चर्चा अडचणीत आल्याचे बोलले जात आहे. काल अजित पवार यांच्या निवासस्थानी शरद पवार गटाचे नेते अमोल कोल्हे आणि रोहित पवार यांनी चर्चा केली होती. मात्र या बैठकीत कोणताही ठोस तोडगा निघू शकला नाही.
दरम्यान, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पुणे महापालिका निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. यासंदर्भात काल रात्री शरद पवार गट, उद्धव ठाकरे गटाची शिवसेना आणि मनसे यांच्यात पुण्यात प्रदीर्घ चर्चा झाल्याचे समजते. महाविकास आघाडीत मनसेचा समावेश होणार का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीन फेऱ्यांपर्यंत चर्चा झाल्या होत्या.
मात्र घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव शरद पवार गटाला मान्य नसल्याने आघाडीची शक्यता मावळली आहे. त्यामुळे आज किंवा लवकरच दोन्ही पक्षांकडून स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याबाबत अधिकृत संकेत दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आह

