मुंबई : पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर याने पुणे महापालिकेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून, सध्या तो येरवडा केंद्रीय तुरुंगात आहे. 27 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्याला न्यायालयाच्या सशर्त परवानगीनंतर पोलीस बंदोबस्तात भवानी पेठ येथील सरकारी केंद्रात आणण्यात आले होते. मात्र आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने त्याचा अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी स्वीकारला नाही.
विशेष मकोका न्यायालयाच्या आदेशानुसार आंदेकरला उमेदवारी अर्ज भरण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर तो पोलीस व्हॅनमधून सरकारी केंद्रात दाखल झाला. यावेळी त्याचा चेहरा काळ्या कापडाने झाकलेला होता आणि दोन्ही हात रशीने बांधलेले होते. सरकारी केंद्रात नेत असताना त्याने “आंदेकरला मत म्हणजे विकासाला मत” अशी घोषणाबाजी केल्याचेही दिसून आले.
निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, आंदेकरने सादर केलेला अर्ज अपूर्ण असल्याने तो तत्काळ स्वीकारता आला नाही. आवश्यक कागदपत्रे सादर न केल्यास नामांकन प्रक्रिया पूर्ण मानली जाणार नाही, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. आंदेकरचे वकील मिथुन चव्हाण यांनी माहिती देताना सांगितले की, अर्ज दाखल करण्यात आला असून काही औपचारिक कागदपत्रे अद्याप बाकी आहेत. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आंदेकर 29 डिसेंबर रोजी पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. भवानी पेठ वॉर्ड कार्यालयातून तो अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आंदेकरची वहिनी लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांनीही न्यायालयाच्या परवानगीनंतर आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या दोघींवर आयुष कोमकर हत्या प्रकरणात आरोपी म्हणून गुन्हे दाखल आहेत. 5 सप्टेंबर रोजी नाना पेठ परिसरात गोळी झाडून आयुष कोमकरची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणानंतर आयुषच्या आईने तीव्र प्रतिक्रिया देत, बंडू आंदेकरला कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी दिल्यास आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. “माझ्या मुलाला विकासासाठी मारले का?” असा सवाल करत त्यांनी आपली व्यथा मांडली.
मुंबई, पुण्यासह राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर आंदेकरच्या उमेदवारीमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

