Explore

Search

February 9, 2026 6:43 am

मुंबई महापालिका निवडणूक: भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर, 66 नावांवर शिक्कामोर्तब; महिला उमेदवारांचा ठसा ठळक !

मुंबई : महानगरपालिकेच्या बहुचर्चित निवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असताना भाजपने 66 उमेदवारांना एबी फॉर्म देत निवडणूक रणांगणात उतरवले आहे. विशेष म्हणजे या यादीत महिला उमेदवारांचे प्रमाण लक्षणीय असून भाजपकडून ‘रणरागिणींचा’ प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो आहे.

देशात आणि महाराष्ट्रात सत्ता असलेल्या भाजपसाठी मुंबई महापालिका अद्यापही अपूर्ण स्वप्न ठरले आहे. 2017 च्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेपासून वेगळे होत स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. त्या वेळी भाजपचे 82 नगरसेवक निवडून आले असले, तरी महापालिकेवर सत्ता स्थापन करण्यात पक्षाला यश आले नव्हते. यापूर्वी शिवसेनेसह युतीत निवडणूक लढवल्याने महापौरपद शिवसेनेकडेच जात होते. यंदाच्या निवडणुकीत भाजप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युतीत मैदानात उतरणार असून या युतीत भाजप ‘मोठा भाऊ’ तर शिंदे गटाची शिवसेना ‘छोटा भाऊ’ या भूमिकेत असेल. त्यामुळे यावेळी भाजपसमोर महापौरपद मिळवण्याची सुवर्णसंधी असून, त्यासाठी पक्ष पूर्ण ताकदीनिशी प्रचारात उतरण्याची तयारी करत आहे.

भाजपच्या पहिल्या यादीत विविध प्रभागांमधून अनुभवी तसेच नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. महिला उमेदवारांमध्ये तेजस्वी घोसाळकर, राणी त्रिवेदी, सीमा शिंदे, जिग्ना शाह, स्वाती जैस्वाल, अंजली सामंत, स्वप्ना म्हात्रे, अर्चना भालेराव यांसारख्या नावांचा समावेश आहे. तर पुरुष उमेदवारांमध्ये नील सोमय्या, मकरंद नार्वेकर, रवी राजा, गणेश खणकर, सिद्धार्थ शर्मा, मिलिंद शिंदे यांसारखे प्रस्थापित चेहरे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

उर्वरित जागांसाठी भाजपची पुढील यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून, महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी भाजपने कंबर कसल्याचे स्पष्ट संकेत या पहिल्या यादीतून मिळत आहेत.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर