Explore

Search

February 9, 2026 6:44 am

मुंबई महापालिका निवडणूक: महायुतीचे जागावाटप जाहीर, चौरंगी लढतीची रंगत वाढली !

मुंबई : महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. महायुतीमधील जागावाटपाचा प्राथमिक आराखडा निश्चित झाला असून, भारतीय जनता पार्टी १३७ जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ९० जागांवर उमेदवार उभे करणार आहे. महायुतीतील इतर सहयोगी पक्षांनाही याच वाटपामध्ये स्थान देण्यात येणार असून, एकूण २२७ जागांपैकी सुमारे २० जागांबाबत अद्याप अंतिम निर्णय प्रलंबित आहे.

या निवडणुकीत यंदा चौरंगी लढत होण्याची दाट शक्यता आहे. उद्धव ठाकरे गटाची शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी एकत्र येत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातही युती झाली असून त्या आघाडीने स्वतंत्र रणनिती आखली आहे.

दरम्यान, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महायुतीकडून मात्र १५० हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असून, मुंबईच्या महापौरपदी मराठी उमेदवार विराजमान करण्याचा निर्धार युतीने व्यक्त केला आहे. आगामी काळात उमेदवार निवड आणि प्रचाराची रणधुमाळी आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर