शिरूर : पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील आंबळे गावात जमिनीच्या वादातून एका वृद्ध शेतकऱ्यावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात एक जण जखमी झाला असून याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विलास नारायण बेंद्रे (वय ६०, व्यवसाय शेती, रा. आंबळे, ता. शिरूर) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिनांक ३० डिसेंबर २०२५ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आंबळे गावाच्या हद्दीत महेश विष्णू करे यांच्या बांधकाम सुरू असलेल्या स्लॅबवर ही घटना घडली. आरोपी संजय बाळासाहेब बेंद्रे याने फिर्यादी यांच्याकडे शेजारील जागेतील ४ फूट रुंद व ६० फूट लांबीची जागा विक्रीस देण्याची मागणी केली. मात्र, फिर्यादी यांनी जागा देण्यास नकार देत हा विषय सोडून देण्यास सांगितले. यानंतर आरोपीने तेथेच पडलेला लोखंडी गज उचलून फिर्यादी यांच्या पाठीवर, डोक्यावर व डाव्या पायावर जबर मारहाण केली.मारहाणीत फिर्यादी खाली कोसळले असता आरोपीने त्यांना पायाला धरून ओढले तसेच स्लॅबखाली टाकून जीवे मारण्याची धमकी दिली. लोखंडी रॉडने झालेल्या या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले आहेत.
या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार शिंदे हे करत असून, दाखल अमल पोलीस हवालदार मोरे यांनी केला आहे. शिरूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
