नवी मुंबई : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा माहोल सध्या तापलेला असताना आज अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस पार पडला. मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने अनेक प्रभागांमध्ये नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. उद्या उमेदवारांची अंतिम यादी आणि निवडणूक चिन्हांचे वाटप होणार असून, त्यानंतर प्रचाराचा धडाका सुरू होणार आहे.
या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत आज भारतीय जनता पक्षाकडून भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. रवींद्र चव्हाण यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या पक्षप्रवेशाची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासकेंद्रित नेतृत्वाने प्रेरित होऊन नवी मुंबई परिसरातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले. या पक्षप्रवेशात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तसेच इतर पक्षांतील लीलाताई वाघमारे, कुंदा वाघमारे, जसप्रीत कौर, अर्चना पवार, मनिष तांबे, अमित शिंदे, डॉ. चेतना शिंदे, धनराज सोनावणे, सचिन कळमकर, काशिनाथ भोईटे, बाळू शिंदे, चंद्रकांत लोहाटे, शीतल शिंदे, दिलीप देशमुख यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या घडामोडीमुळे नवी मुंबईतील भाजपचे संघटन अधिक मजबूत झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या पक्षप्रवेश सोहळ्याला मंत्री गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, तसेच भाजप नवी मुंबई जिल्हाध्यक्ष राजेश पाटील, महानगरपालिकेचे उमेदवार आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
https://x.com/RaviDadaChavan/status/2007087288304664589?s=20
दरम्यान, दोन दिवसांत महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला अधिकृत सुरुवात होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे अनेक प्रमुख नेते मैदानात उतरतील. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेही प्रचारासाठी राज्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

