पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर येऊ लागले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर थेट आरोपांची झोड उठवल्यानंतर राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.
७० हजार कोटींच्या कथित गैरव्यवहाराच्या आरोपांवर भाष्य करताना, “आरोप करणाऱ्यांसोबतच मी सत्तेत आहे,” असे विधान अजित पवार यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. याच वेळी पुण्यात केंद्र व राज्य सरकारकडून मोठा निधी मंजूर असूनही विकासकामे संथ गतीने सुरू असल्याचा आरोप त्यांनी भाजपवर केला. या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दांत प्रत्युत्तर दिले. “तुम्ही इतकी वर्षे पुण्याचे पालकमंत्री होतात, मग भरीव विकास का झाला नाही?” असा थेट सवाल त्यांनी अजित पवारांना केला. यावेळी भाषणात त्यांनी शेरोशायरीचा आधार घेत दादांना इशाराही दिला.
“शरीफ हैं हम, किसी से लड़ते नहीं… मगर जमाना जानता है, हम किसी के बाप से डरते नहीं,” असे म्हणत फडणवीस यांनी राजकीय ताकद दाखवली. तसेच, मागील पाच वर्षांत नेमकं काय केलं याचं उत्तर शोधायचं असेल, तर आरशात पाहावं लागेल, असा टोला त्यांनी लगावला.
दरम्यान, कात्रज येथील सभेत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही अजित पवारांवर टीकेचा भडिमार केला. पुणेकर आता महापालिकेत विरोधकांना सत्तेत येऊ देणार नाहीत, असा दावा मोहोळ यांनी केला. तर, “इतकी वर्षे पालकमंत्री असताना पुण्याचा ठोस विकास का झाला नाही?” असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. या साऱ्या घडामोडींमुळे पुण्यातील निवडणूक प्रचाराला आता खऱ्या अर्थाने धार आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सूचक इशारा देताना म्हटलं की, चर्चा जितकी मागे जाईल तितकं ‘तुम्ही काय केलं’ हे लोकांना सांगावं लागेल. उत्तर न दिल्यास लोक दुर्बल समजतात, पण आमचा निवडणुकीचा केंद्रबिंदू विकास आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुण्यात अलीकडेच तीन हजार कोटींच्या कामांना सुरुवात झाली असून सध्या तब्बल नऊ हजार कोटी रुपयांची विकासकामे सुरू असल्याचा उल्लेख करत फडणवीस यांनी अजित पवारांच्या आरोपांना प्रतिउत्तर दिले. एकंदर पाहता, पुणे–पिंपरी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील संघर्ष उघडपणे समोर येत असून, येत्या काळात ही राजकीय लढाई अधिक तीव्र होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
