Explore

Search

February 9, 2026 6:43 am

पुणे महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाला मोठा धक्का; उमेदवारांचा भाजपमध्ये प्रवेश !

पुणे : राज्यभरात 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना पुण्यातील राजकीय घडामोडींनी अचानक वेग घेतला आहे. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठा झटका बसला असून प्रभाग क्रमांक 9 आणि 11 मधील बंडखोर तसेच अधिकृत उमेदवारांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

कोथरूड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 9 आणि 11 मध्ये ठाकरे गटाचे उमेदवार भाजपमध्ये सामील झाल्याने स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या सर्व उमेदवारांनी भाजपच्या अधिकृत उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला असून, यामुळे आगामी निवडणुकीत भाजपची ताकद वाढल्याचे चित्र आहे.

प्रभाग क्रमांक 9 मधील बंडखोर उमेदवार महेश सुतार (ड), पूजा सुतार (क), नियोजन समितीचे सदस्य सुखदेव तापकीर, तसेच प्रभाग क्रमांक 11 (अ) मधील अधिकृत उमेदवार बाळासाहेब धनवडे, विद्यार्थी सेनेचे अमर गायकवाड आणि माजी नगरसेवक पैलवान दिलीपदादा गायकवाड यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला.

हा पक्षप्रवेश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि भाजप नेते चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोथरूड येथील निवासस्थानी पार पडला. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सर्व नव्याने प्रवेश केलेल्या नेत्यांचे स्वागत करत त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे पक्षप्रवेश भाजपसाठी अत्यंत सकारात्मक आहेत. यापूर्वी दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, आता प्रभाग 9 आणि 11 मधील उमेदवारांच्या प्रवेशामुळे भाजपची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत झाली आहे. हा विजयाचा स्पष्ट संकेत आहे.”

या प्रसंगी प्रभाग क्रमांक 9 मधील भाजप उमेदवार लहू बालवडकर, गणेश कळमकर, रोहिणी चिमटे, तसेच प्रभाग क्रमांक 11 मधील उमेदवार अजय मारणे, अभिजीत राऊत यांच्यासह भाजपचे नेते डॉ. संदीप बुटाला, प्रकाशतात्या बालवडकर, प्रल्हाद सायकर, राहुल कोकाटे, शिवम बालवडकर आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

या घडामोडींमुळे पुण्यातील महापालिका निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत असून, ठाकरे गटासमोर आव्हाने वाढल्याचे स्पष्ट होत आहे.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर