Explore

Search

February 9, 2026 6:42 am

सावरकरांच्या मुद्द्यावर भाजप–राष्ट्रवादीत मतभेद उघड, महायुतीतील तणाव वाढण्याची शक्यता !

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यात मतभेद उफाळून येत असल्याचे चित्र आहे. 70 हजार कोटींच्या आरोपांवर भाष्य करताना “आरोप करणाऱ्यांसोबतच मी सत्तेत आहे” असे विधान अजित पवार यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला.

या विधानानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली. भाजप नेते आशिष शेलार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आम्ही सावरकरांचे भक्त आहोत आणि सावरकरी विचारांवर चालणारा आमचा पक्ष आहे. त्यामुळे आमच्यासोबत सत्तेत राहायचे असेल, तर सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील. याल तर सोबत, न याल तर आमच्याविना — आम्ही आमचे काम करत राहू,” असा थेट इशाराही त्यांनी दिला. यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी प्रत्युत्तर देताना, “कोणालाही जबरदस्तीने विचार लादता येत नाही. भारत हा संविधानावर चालणारा देश आहे,” असे सांगत भाजपच्या भूमिकेवर अप्रत्यक्ष टीका केली.

या संपूर्ण वादावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत भाजपची भूमिका ठाम असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, वीर सावरकर यांच्या विचारांचा अजित पवार यांनी विरोध केल्याचे मला कधीच दिसले नाही. मात्र, वीर सावरकरांचा विरोध आम्हाला कोणत्याही परिस्थितीत मान्य नाही, ही आमची भूमिका कायम आहे.” मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर सावरकरांचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

या सर्व घडामोडींवर अजित पवार यांना विचारले असता त्यांनी थेट टीका टाळत सावध भूमिका घेतली. “मला विकासाबाबत प्रश्न विचारा. महायुतीतील मतभेदांबाबत किंवा इतर राजकीय प्रश्नांवर मी आत्ता बोलणार नाही. महानगरपालिकेच्या निवडणुकांबाबतच प्रश्न विचारावेत. निवडणुका संपल्यानंतर प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देईन,” असे त्यांनी स्पष्ट केले.

सावरकरांच्या मुद्द्यावर भाजपने आपली भूमिका अधिक ठामपणे मांडली असताना, राष्ट्रवादीकडून संयमित प्रतिक्रिया दिली जात आहे. त्यामुळे येत्या काळात या मुद्द्यावर राष्ट्रवादीची नेमकी भूमिका काय असणार आणि त्याचा महायुतीवर कितपत परिणाम होणार, हे पाहणे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे ठरणार आहे

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर