Explore

Search

May 6, 2026 4:53 pm

पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार विरुद्ध महेश लांडगे : आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापले !

पिंपरी चिंचवड : पुणे जिल्ह्यातील ने आणि पिंपरी-चिंचवड परिसरात राजकीय वातावरण तापले असून अजित पवार आणि भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्यातील शाब्दिक संघर्ष तीव्र झाला आहे. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर जोरदार आणि गंभीर आरोप केले आहेत.

अजित पवार यांनी स्थानिक पातळीवरील गुंडगिरीविरोधात कडक भूमिका घेत, कोणीही कितीही मोठा असला तरी अशा प्रवृत्ती मोडून काढल्या जातील, असा इशारा दिला. माझ्याशी कोणी वाकडं घेतलं, तर त्याला सोडणार नाही, असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले.

त्यावर प्रत्युत्तर देताना महेश लांडगे यांनी थेट आव्हान दिले. “आता आम्ही वाकड्यात गेलो आहोत, पुढे काय करायचं ते पाहू,” असे म्हणत त्यांनी संघर्ष अधिकच चिघळवला. यासोबतच लांडगे यांनी अजित पवारांवर तब्बल ७० हजार कोटी रुपयांच्या कथित सिंचन घोटाळ्याचे आरोप पुन्हा उचलून धरले. या प्रकरणातून वाचण्यासाठीच अजित पवारांनी भाजपसोबत हातमिळवणी केल्याचा दावा त्यांनी केला.

दरम्यान, अजित पवारांनीही भाजपवर पलटवार करत महापालिकेच्या कारभारात भ्रष्टाचार असल्याचा आरोप केला. भाजपला सत्तेची आणि पैशांची ‘राक्षसी भूक’ असल्याची टीका त्यांनी केली. राज्य पातळीवर भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत एकत्र असली, तरी आगामी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे स्थानिक राजकारणात आरोप-प्रत्यारोपांची धार अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर