Explore

Search

February 9, 2026 6:43 am

देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा: पुण्यात 23 उड्डाणपूल आणि 54 किमी टनेल नेटवर्क, ‘पुणे माझं आवडतं शहर’

पुणे :  राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यात दाखल झाले होते. या दौऱ्यात अभिनेत्री गिरिजा ओक यांनी त्यांची खास मुलाखत घेतली. या संवादात फडणवीस यांनी पुण्याच्या विकासात्मक प्रश्नांवर सविस्तर भूमिका मांडली तसेच आगामी काळातील सरकारच्या योजनांची माहिती दिली.

मुलाखतीदरम्यान देवेंद्र फडणवीस यांना “आपण पुण्यातून निवडणूक लढवणार का?” असा थेट प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्यांनी हसत सांगितले की, “इथे चंद्रकांत दादा आहेत, मुरली अण्णा आहेत. सगळं सुरळीत सुरू आहे. त्यामुळे पुण्यावर प्रेम करणंच योग्य वाटतं. नागपूरकरांचं आमच्यावर भरभरून प्रेम आहे आणि आम्ही सहावेळा निवडून आलो आहोत. तरीही पुणे हे माझं अत्यंत आवडतं शहर आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

पुण्याच्या पायाभूत सुविधांबाबत बोलताना फडणवीस यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या. त्यांनी सांगितले की, पुण्यात एकूण 23 नवीन उड्डाणपूल उभारले जाणार असून त्यापैकी 8 पुलांची कामे आधीच सुरू झाली आहेत. उर्वरित 15 पुलांची कामे येत्या तीन महिन्यांत सुरू होतील. हे उड्डाणपूल पुढील 20 ते 25 वर्षे तोडण्याची गरज भासणार नाही, अशा दर्जाचे असतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुण्यात जागेची कमतरता लक्षात घेता सरकार ‘पाताळलोक’ अर्थात भुयारी मार्गांची संकल्पना राबवणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. शहरात सुमारे 54 किलोमीटर लांबीचे टनेल नेटवर्क उभारले जाणार असून यासाठी सुमारे 32 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. येरवडा ते कात्रज, पाषाण–कोथरूड, औंध–संगमवाडी अशा प्रमुख मार्गांवर हे टनेल असतील. या प्रकल्पाचे संपूर्ण नियोजन तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

एकूणच, पुण्याच्या विकासासाठी दीर्घकालीन आणि भक्कम पायाभूत सुविधा उभारण्यावर राज्य सरकारचा भर असल्याचा संदेश या मुलाखतीतून मिळाला.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर