मुंबई : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांसाठी आज मतदान सुरू असताना अनेक ठिकाणी गोंधळाचे चित्र दिसून येत आहे. तांत्रिक अडचणी, पक्षांतर्गत बंडखोरी, कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न आणि प्रशासनावरील आरोप-प्रत्यारोप यामुळे निवडणूक प्रक्रिया चर्चेत आली आहे. पुणे, मुंबई, धुळे आणि पालघर जिल्ह्यातील घटनांनी वातावरण तापले आहे. पुण्यातील प्रभाग क्रमांक २७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासमोर अडचणी वाढल्या आहेत. या प्रभागात घड्याळ चिन्हावर चार तर तुतारी चिन्हावर दोन बंडखोर उमेदवार रिंगणात असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. पक्षाच्या सूचनांनंतरही उमेदवारी कायम ठेवणाऱ्या उमेदवारांनी ज्येष्ठ नेत्यांचे फोटो प्रचारात वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी ज्येष्ठ नेते अंकुश काकडे यांनी न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला आहे.
याच दरम्यान, अंकुश काकडे यांनी मतदान केंद्रावरील ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचा गंभीर आरोप केला. चौथे बटण दाबल्यानंतर दिवा न लागल्याची तक्रार त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे नोंदवण्याचा आग्रह धरला. तक्रार नोंदवली जाईपर्यंत केंद्रावरून न जाण्याची आक्रमक भूमिका त्यांनी घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते. मुंबईतील चेंबूर परिसरात मध्यरात्री मोठा गोंधळ झाला. बीएमसी शाळेतील मतदान केंद्राजवळ बोगस ओळखपत्रासह फिरणाऱ्या संशयिताला शिवसेना (UBT) कार्यकर्त्यांनी पकडले. या घटनेनंतर स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला असून गोवंडी पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे. तो व्यक्ती मध्यरात्री मतदान केंद्रात का शिरला होता, याचा तपास सुरू आहे.
धुळे शहरात मतदान केंद्रांच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मतदान केंद्रे रहिवासी भागापासून दूर ठेवण्यात आल्याने मतदारांची गैरसोय होत असल्याचा आरोप शिवसेना महानगरप्रमुख संजय वाल्हे यांनी केला आहे. अचानक केंद्रांच्या ठिकाणी बदल झाल्याने मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पालघर जिल्ह्यातील नालासोपारा पूर्व येथील पेल्हार फाटा परिसरात मध्यरात्री एका कारमधून तब्बल २९ दारूचे बॉक्स जप्त करण्यात आले. मतदारांना आमिष दाखवण्यासाठी ही दारू नेली जात असल्याचा संशय असून पोलिसांनी वाहनासह साठा जप्त केला आहे. ही दारू नेमकी कोणासाठी होती, याचा तपास सुरू आहे.
एकूणच महापालिका निवडणुकांच्या मतदानादरम्यान राज्यातील विविध भागांतून समोर आलेल्या घटनांमुळे निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून प्रशासन आणि राजकीय पक्षांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

