Explore

Search

March 22, 2026 4:30 am

पुणे महापालिका निवडणूक : भाजपची आघाडी, अजित पवार गटाला मोठा फटका !

पुणे : नववर्षानंतर प्रथमच पुणेकरांना आपला कौल नोंदवण्याची संधी मिळाली असून, तब्बल नऊ वर्षांनंतर झालेल्या पुणे महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीचे सुरुवातीचे कल समोर आले आहेत. शहरातील ४१ प्रभागांतून एकूण १६५ नगरसेवक निवडले जाणार असून, यावेळी चौरंगी लढत पाहायला मिळाली. महायुतीतील घटक पक्ष स्वतंत्रपणे मैदानात उतरल्यामुळे ही निवडणूक अधिकच चुरशीची ठरली. या स्पर्धेचा सर्वाधिक फटका अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाला बसल्याचे प्राथमिक चित्रातून स्पष्ट होत आहे. त्यांच्या गटाचे केवळ तीन उमेदवार आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, भारतीय जनता पक्षने दमदार कामगिरी करत १६५ पैकी तब्बल ४७ जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेसलाही मर्यादित यश मिळत असून दोन जागांवर तिचे उमेदवार पुढे आहेत. काही प्रमुख प्रभागांमध्ये भाजपने स्पष्ट आघाडी घेतली आहे. कसबा प्रभागासह इतर भागांत भाजपच्या उमेदवारांनी पहिल्या फेरीतच निर्णायक आघाडी मिळवली. कुणाल टिळक, स्वरदा बापट, स्वप्नाली पंडित आणि राघवेंद्र मानकर यांसारखे उमेदवार आघाडीवर असून, रुपाली पाटील ठोंबरे यांना मात्र पिछाडीचा सामना करावा लागत आहे.

दुसरीकडे, अलीकडेच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले माजी महापौर प्रशांत जगताप हे वानवडी प्रभागातून निवडणूक लढवत असून सुरुवातीच्या कलांमध्ये ते मागे असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीतील (शरद पवार गट) अंतर्गत मतभेदांनंतर त्यांनी काँग्रेसची वाट धरली होती. मात्र, यावेळी वानवडीत त्यांना अपेक्षित सुरुवात मिळालेली नाही. एकूणच, मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यातून भाजपची बाजू मजबूत असल्याचे संकेत मिळत असून, पुढील फेऱ्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर