Explore

Search

March 22, 2026 4:28 am

मुंबई महापालिकेत महायुतीची आघाडी, प्रविण दरेकरांची आक्रमक प्रतिक्रिया; भावाचा विजय ठरला चर्चेचा विषय !

मुंबई : राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान पार पडले असून आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आतापर्यंत समोर आलेल्या कलानुसार 227 जागांपैकी भाजप–शिवसेना (शिंदे गट) महायुती 129 जागांवर आघाडीवर आहे.

या पार्श्वभूमीवर भाजप नेते प्रविण दरेकर यांनी दिलेल्या प्रतिक्रियेने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. माध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले की, “मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा नरेंद्र मोदी यांनी दिला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला पाठबळ दिले. मुंबईतील मराठी माणूस शहरातच राहावा यासाठी बिडीडी चाळीसारख्या ठिकाणी घरे देण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केले.”

दरेकर यांनी विरोधकांवरही टीका केली. “ज्यांनी आयुष्यभर मराठी माणसाच्या नावावर राजकारण केले, त्यांचे दुकान आता बंद झाले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांसोबत विकासाची भूमिका घेऊन आम्ही पुढे जात आहोत,” असे ते म्हणाले.

निवडणूक आकडेवारीनुसार भाजप 98 जागांवर तर शिंदे गटाची शिवसेना 31 जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (ठाकरे गट) 62 जागांवर आघाडीवर आहे. मनसे 9, काँग्रेस 13, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) 2 जागांवर आघाडीवर असल्याची माहिती आहे.  दरम्यान, या निवडणुकीत प्रविण दरेकर यांच्या कुटुंबाचाही विजय नोंदवला गेला आहे. त्यांचे भाऊ प्रकाश दरेकर यांनी मुंबईतील प्रभाग क्रमांक 3 मधून विजय मिळवला असून, हा निकालही चर्चेचा ठरला आहे.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर