मालेगाव : राज्यातील २९ महापालिकांचे निकाल आता जवळपास स्पष्ट झाले असून बहुतांश ठिकाणी भाजपाने दमदार कामगिरी करत वर्चस्व राखले आहे. मुंबई महापालिकेतील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले असताना, सुरुवातीच्या कलांनुसार भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या युतीने १२२ पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेत मोठी मुसंडी मारली आहे. तर शिंदे गट आणि मनसे यांची युती सुमारे ७० जागांवर आघाडीवर आहे.
मात्र या सगळ्या चित्रापेक्षा पूर्णपणे वेगळे आणि धक्कादायक चित्र मालेगाव महापालिकेत पाहायला मिळत आहे. राज्यभर भाजपाची लाट दिसत असताना, मालेगावात मात्र भाजपाला मोठा फटका बसला आहे. येथे भाजपाला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले असून, सत्ता समीकरण पूर्णपणे बदलले आहे. मालेगाव महापालिकेतील निकालानुसार इस्लाम पार्टीने सर्वाधिक १९ जागा जिंकत आघाडी घेतली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला १८ जागांवर विजय मिळाला आहे. समाजवादी पार्टीने ५ जागा, तर एमआयएमने ४ जागांवर बाजी मारली आहे. काँग्रेसला फक्त एका जागेवर विजय मिळवता आला असून एका अपक्ष उमेदवारानेही यश मिळवले आहे.
महत्त्वाचे म्हणजे मालेगावात इस्लाम पार्टी आणि समाजवादी पार्टी यांनी ‘सेक्यूलर फ्रंट’च्या नावाने आघाडी केली होती. या आघाडीला मिळालेल्या यशामुळे आता मालेगाव महापालिकेवर इस्लाम पार्टी–समाजवादी पार्टी यांची सत्ता स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मालेगावचा निकाल विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.

