पिंपरी चिंचवड : राज्यातील प्रलंबित महापालिका निवडणुकांचा बिगुल अखेर राज्य निवडणूक आयोगाने फुंकला. प्रशासकीय राजवटीखाली असलेल्या 29 महापालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार 15 जानेवारी 2026 रोजी मतदान पार पडल्यानंतर 16 जानेवारी 2026 रोजी निकाल जाहीर झाले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीकडे राज्याचे विशेष लक्ष लागले होते. 2017 मध्ये येथे भाजपाची एकहाती सत्ता होती. मात्र, यंदा राजकीय समीकरणे पूर्णपणे बदललेली दिसत आहेत. काही ठिकाणी विरोधकांची आघाडी असली तरी निकालांच्या कलातून भाजप पुन्हा वरचढ ठरत असल्याचे चित्र समोर येत आहे.
प्रभाग क्रमांक 21 मध्ये मिलिंदनगर, संजय गांधीनगर, पिंपरी गाव आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलनीचा समावेश असून येथे सुमारे 40 हजारांहून अधिक मतदार आहेत. यावेळी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने भाजपासाठी हे आव्हान मानले जात होते. मात्र, प्रत्यक्ष निकालांमध्ये अजित पवार गटाचे उमेदवार पिछाडीवर पडताना दिसत असून भाजपची आघाडी कायम आहे. दरम्यान, प्रभाग क्रमांक 23 मध्येही चुरशीची लढत पाहायला मिळाली. 2017 मध्ये भाजपचे वर्चस्व असलेल्या या प्रभागात यंदा ते टिकवणे मोठे आव्हान होते. भक्ती शक्ती परिसर, सेक्टर 24 ते 27 आणि केंद्रीय वसाहत यांचा समावेश असलेल्या या प्रभागात सुमारे 36,947 मतदार आहेत. प्रभाग क्रमांक 24 कडेही सर्वांचे लक्ष केंद्रित झाले होते. 2017 मध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यात येथे काट्याची लढत झाली होती. मामुर्डी, किवळे, विकासनगर आणि रावेत परिसर असलेल्या या प्रभागात सुमारे 38 हजार मतदार आहेत. यंदाही येथे जोरदार राजकीय संघर्ष पाहायला मिळाला.
तसेच प्रभाग क्रमांक 25 मध्ये वाल्हेकरवाडी, गुरुद्वार परिसर, डी. वाय. पाटील कॉलेज, शिंदेवस्ती आणि रेल्वे लाईन लगतचा भाग येतो. या प्रभागात पारंपरिकरित्या भाजपचे वर्चस्व राहिले असून यंदाही त्या प्रभावाची झलक निकालांमध्ये दिसून येत आहे.
एकूणच, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत काही ठिकाणी समीकरणे बदलली असली, तरी अनेक प्रभागांत भाजपची ताकद कायम असल्याचे निकालातून स्पष्ट होत आहे.
