Explore

Search

March 22, 2026 4:07 am

नगरपरिषदा ते महापालिका: महाराष्ट्रात भाजपचा दबदबा, देवेंद्र फडणवीस ठरले राजकारणातील ‘धुरंधर’ !

मागील महिन्यात प्रदर्शित झालेल्या धुरंधर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार यश मिळवलं. ‘धुरंधर’ म्हणजे आपल्या क्षेत्रात इतरांपेक्षा सरस ठरणारा, सगळ्यांना चकीत करणारी कामगिरी करणारा. हाच शब्द सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात प्रकर्षाने लागू होतो तो म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्यावर.

राज्यात नुकतेच नगरपरिषदा आणि त्यानंतर महाराष्ट्रतील 29 महानगरपालिकांचे निकाल जाहीर झाले. या निकालांमधून एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे राज्याच्या राजकारणात भारतीय जनता पार्टीने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप राज्यातील नंबर एकचा पक्ष म्हणून पुढे आला आहे. 29 पैकी मुंबईसह तब्बल 25 महानगरपालिकांमध्ये भाजपने सत्ता मिळवली आहे. पुणे आणि नाशिकसारख्या महत्त्वाच्या महापालिकांमध्येही भाजपने विजय मिळवत आपली संघटनात्मक ताकद दाखवून दिली. सर्वाधिक नगराध्यक्ष आणि महापालिकांवर भाजपचा झेंडा फडकताना दिसतो आहे.

केडर बेस असलेला पक्ष म्हणून भाजप सत्तेचा वापर पक्षविस्तारासाठी प्रभावीपणे करत असल्याचं चित्र आहे. विजयाचं श्रेय जरी सामूहिक नेतृत्वाला दिलं जात असलं, तरी या यशामागचा प्रमुख रणनितीकार देवेंद्र फडणवीस असल्याचं राजकीय वर्तुळात मान्य केलं जातं. 2014 मध्ये मोठ्या भावाच्या भूमिकेत महाराष्ट्राची सत्ता मिळवल्यानंतर फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. त्यानंतर भाजपने राज्यभर आपला प्रभाव वाढवला. 2019 मध्ये बहुमत नसलं तरी युतीमुळे सत्ता शक्य होती; मात्र त्या काळात सत्तेबाहेर राहावं लागलं. नंतर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं आणि फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं. 2024 मध्ये महायुतीने पुन्हा बहुमत मिळवत फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले.

गेल्या 11 वर्षांत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात प्रभावी नेते म्हणून उदयास आले आहेत. “दिल्लीमध्ये नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र” अशी ओळख निर्माण झाली आहे. स्वतः श्रेय न घेता पक्षाच्या बळावर यश मिळाल्याचं सांगणारे फडणवीस आज भाजपने घडवलेला एक ‘धुरंधर’ नेता ठरले आहेत. आता प्रश्न एकच आहे – महाराष्ट्रात यशस्वी ठरलेला ‘देवेंद्र पॅटर्न’ भाजप इतर राज्यांमध्येही राबवणार का, आणि तिथेही असेच प्रभावी नेते घडवणार का?

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर