Explore

Search

March 22, 2026 4:08 am

महापालिका निकालांनी पवारांची कसोटी, भाजपचा झंझावात आणि राष्ट्रवादीसमोरील अस्तित्वाचा प्रश्न !

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांच्या निकालांनी राज्याच्या राजकारणातील अनेक समज-गैरसमज बदलून टाकले आहेत. एकीकडे भारतीय जनता पक्ष ने दणदणीत कामगिरी करत वर्चस्व सिद्ध केले, तर दुसरीकडे पवार कुटुंबाच्या राजकीय ताकदीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मुंबईत ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्यानंतर आता पुणे-पिंपरीत पवारांची पकड सैल होत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

महायुतीत सत्तेत सहभागी असलेले अजित पवार यांना या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही. पुणे महापालिकेत १६५ जागांपैकी भाजपने तब्बल १२० जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला २६ जागा आल्या, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला अवघ्या ३ जागांवर समाधान मानावे लागले. हीच स्थिती पिंपरी-चिंचवडमध्येही दिसून आली. १२८ जागांच्या सभागृहात भाजपने ८४ जागा मिळवत दोन्ही राष्ट्रवादी गटांना मागे टाकले. अजित पवार गट ३७ जागांवर थांबला, तर शरद पवार गटाला खातेही उघडता आले नाही.

या निकालांनी “काका-पुतण्या” या राजकीय नात्याच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. कधी शरद पवार यांच्या नेतृत्वाची गरज असल्याचे संकेत देणारे अजित पवार, तर कधी वेगळी भूमिका घेणारे अजितदादा – या दोन्ही भावनिक आणि राजकीय छटा मतदारांना पटल्या नाहीत, असेच निकालातून स्पष्ट झाले. पुणे आणि पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र किंवा समन्वयाने लढल्यास भाजपला रोखता येईल, असा अंदाज फोल ठरला.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसाठी हे निकाल अधिक धक्कादायक ठरले आहेत. राज्यातील अनेक महापालिकांमध्ये पक्षाला शून्यावर समाधान मानावे लागले. त्यांच्या प्रभावाच्या मानल्या जाणाऱ्या भागातही करिष्मा दिसून आला नाही. भाजपच्या संघटनशक्तीपुढे राष्ट्रवादीची रणनीती अपुरी पडल्याचे चित्र आहे. तरीही शरद पवार यांचा राजकीय अनुभव आणि डावपेचांची क्षमता आजही अनेक नेत्यांना आश्वस्त करते.

या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येतील का, शरद पवार महायुतीकडे वाटचाल करतील का, किंवा राज्याच्या राजकारणात एखादा मोठा उलथापालथीचा टप्पा येणार का, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. सध्या उत्तरं स्पष्ट नसली, तरी पवारांच्या राजकीय भवितव्याची चर्चा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आली आहे, हे मात्र निश्चित.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर