Explore

Search

February 4, 2026 6:14 am

मुंबई महापौर निवड फेब्रुवारीत? भाजप–शिंदे सेना–उद्धव सेना यांच्यात तिढा कायम !

मुंबई : महापालिकेच्या महापौर पदासाठीची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना ही निवड आता पुढे ढकलण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीनुसार महापौर पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. या पदावर दावा सांगण्यासाठी भाजप आणि शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून हालचाली सुरू असल्या, तरी प्रत्यक्ष निवड प्रक्रिया सध्या रखडलेली आहे.

महापौर पदासाठी 31 जानेवारी रोजी मतदान होणार होते, तर 27 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया नियोजित होती. प्रशासनाकडून त्यासाठी जाहिरात देण्याची तयारीही करण्यात आली होती. मात्र भाजप आणि शिंदे गटाने अद्याप कोकण आयुक्त कार्यालयात आपापल्या गटांची अधिकृत नोंदणी पूर्ण केलेली नाही. यामुळे महापौर निवडीचा संपूर्ण कार्यक्रम स्थगित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी, नवीन महापौरांची निवड आता फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, काँग्रेसचे 24, एमआयएमचे 8 आणि मनसेचे 6 नगरसेवकांनी कोकण भवन येथे नोंदणी पूर्ण करत महापालिका सचिव कार्यालयात प्रमाणपत्र पावत्या जमा केल्या आहेत. उद्धव ठाकरे गटाच्या 65 नगरसेवकांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असली, तरी त्यांनी अद्याप प्रमाणपत्र पावत्या सचिव कार्यालयात जमा केलेल्या नाहीत. भाजप आणि शिंदे गटाच्या नगरसेवकांची नोंदणीही अद्याप झालेली नाही.

महापौर पदावरून सत्ताधारी मित्रपक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असून, बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हे पद शिवसेनेलाच मिळावे, अशी मागणी उद्धव ठाकरे गटाकडून होत आहे. तर शिंदे गटानेही महापौर पदावर आपला हक्क सांगत जोरदार लॉबिंग सुरू केल्याचे बोलले जात आहे. यासाठी ‘हॉटेल डिप्लोमसी’ झाल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मित्रपक्षाला सन्मानजनक पद देत महापौर पदाचा पेच कसा सोडवायचा, हे भाजपसमोर मोठे आव्हान बनले आहे.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर