Explore

Search

February 4, 2026 6:14 am

जिल्हा परिषद निवडणुकीत गडबड खपवून घेणार नाही” – निवडणूक आयोगाला थेट इशारा !

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित यश मिळू न शकल्याने राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादीचा पारंपरिक बालेकिल्ला असलेल्या या भागात भाजपने मोठी मुसंडी मारली, तर राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाव टाकण्यात अपयशी ठरल्याचे चित्र दिसले. या निकालानंतर अनेक ठिकाणी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी निवडणूक आयोग आणि अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. महानगरपालिका निवडणुकीतील पराभवासाठी निवडणूक यंत्रणाच जबाबदार असल्याचा दावा त्यांनी यापूर्वी केला होता.

आता आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. निवडणूक प्रक्रिया कायदेशीर आणि पूर्णतः पारदर्शक पद्धतीने पार पडली पाहिजे, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. कुठल्याही प्रकारचा फेरफार, लबाडी, सत्तेचा किंवा पोलीस बळाचा गैरवापर झाल्यास ते सहन केले जाणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.निवडणूक अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले नाही, तर लोकशाही वाचवण्यासाठी कठोर भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. “सत्तेत बसलेले लोक जर सरकारी खुर्चीचा गैरवापर करत असतील, तर नागरिकांना आपल्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करावाच लागेल,” असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.याशिवाय जिल्हा परिषद निवडणूक प्रक्रियेवर सतत लक्ष ठेवण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया ‘इन कॅमेरा’ राबवण्याची मागणी त्यांनी केली आहे. भाजप वगळता इतर सर्व पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक अधिकाऱ्यांवर आणि प्रक्रियेवर कॅमेऱ्याद्वारे लक्ष ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रचार कमी केला तरी चालेल, पण निवडणूक यंत्रणेवर बारकाईने नजर ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील अनेक महापालिकांमध्ये पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर आक्षेप नोंदवले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद निवडणुकीत मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी संघर्ष अपरिहार्य असल्याचे सांगत, अन्यायाविरोधात एकत्र येण्याचे आवाहन रुपाली पाटील ठोंबरे यांनी केले आहे.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर