मीरा भाईंदर : महापालिका निवडणुकांमध्ये भाजपने अनेक ठिकाणी मोठी आघाडी घेतली असली, तरी काही शहरांमध्ये भाजपविरोधात स्थानिक पातळीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. मित्र पक्षांसह विरोधकांनी एकत्र येत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न सुरू केले असून, “आम्ही सारे” या सूत्राखाली वेगवेगळ्या आघाड्या आकार घेत असल्याचं चित्र आहे.
चंद्रपूर, अकोला, अमरावती, सोलापूरसह अनेक महापालिकांमध्ये भाजपविरोधी समीकरणं जुळवण्याचे प्रयत्न सुरू असतानाच, मिरा-भाईंदर महानगरपालिकेतही असाच प्रयोग समोर आला आहे. येथे काँग्रेस आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी एकत्र येत ‘शहर विकास आघाडी’ची स्थापना केली आहे. त्यामुळे भाजपच्या स्पष्ट बहुमतानंतरही महापालिकेतील राजकारण चांगलंच तापलं आहे.
या नव्या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना शिवसेना (शिंदे गट) नेते व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. “मिरा-भाईंदरमध्ये १६ नगरसेवकांनी पक्षभेद न पाहता शहराच्या विकासासाठी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. महापालिकेत कोणतंही चुकीचं काम होऊ देणार नाही. काही गैरप्रकार घडत असतील तर त्यावर निश्चितपणे अंकुश ठेवला जाईल,” असं सरनाईक यांनी सांगितलं.
भाजपचं वर्चस्व असल्याचं मान्य करतानाच, त्यांनी राज ठाकरे यांनी पाठिंबा दिल्याच्या चर्चांवरही प्रतिक्रिया देत “मला याची माहिती नाही, मात्र पाठिंबा असेल तर त्याबद्दल आभार,” असंही नमूद केलं.
दरम्यान, राज्यातील विविध शहरांमध्ये भाजपविरोधात तयार होत असलेल्या स्थानिक आघाड्यांमुळे आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांसाठी राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू असल्याचं स्पष्ट होत आहे. मिरा-भाईंदरमधील हा प्रयोग भाजपसाठी कितपत आव्हान ठरतो, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
