बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या मोठ्या घडामोडींना वेग आला असून, उपमुख्यमंत्रीपदाबाबत सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. सुनेत्रा पवार या आज सायंकाळी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. याआधीच त्यांनी आपल्या राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी त्यांची निवड करण्यात आली आहे.
शपथविधीपूर्वी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीस पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. याच बैठकीत सुनेत्रा पवार यांची अधिकृतपणे गटनेतेपदी निवड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीबाबत आपल्याला कोणतीही पूर्वकल्पना नव्हती, तसेच या संदर्भात आपल्याशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचं स्पष्ट केलं.
शरद पवार यांच्या या भूमिकेनंतर ते शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती. अखेर यासंदर्भात आमदार रोहित पवार यांनी मोठी माहिती दिली असून, शरद पवार हे आज मुंबईला जाणार नसून, सुनेत्रा पवार यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. आज सायंकाळी 5 वाजता होणाऱ्या शपथविधीसह सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून इतिहास रचणार आहेत.

