मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आज सकाळपासून मोठ्या घडामोडींना वेग आला असून, पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत समीकरणे पुन्हा एकदा केंद्रस्थानी आली आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती जवळपास निश्चित झाली आहे.आज विधिमंडळ भवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची आणि प्रमुख नेत्यांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत पक्षाचा गटनेता निवडला जाणार असून, सुनेत्रा पवार यांचीच विधिमंडळ गटनेतेपदी तसेच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर संध्याकाळी ५ वाजता राजभवनात त्यांचा शपथविधी पार पडणार आहे.
दरम्यान, महत्त्वाच्या खात्यांबाबत मोठी माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्याकडे असलेले अर्थखाते सध्या तरी सुनेत्रा पवार यांच्याकडे दिले जाणार नसून, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांच्याकडे क्रीडा विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २० फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करता यावेळी अर्थसंकल्प स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच सादर करणार आहेत. हे अधिवेशन सध्याच्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणावरून अजित पवार गटात नाराजी असल्याचे संकेत मिळत आहेत. अजित पवार गटातील काही आमदार आणि नेते विलीनीकरणाच्या बाजूने नसल्याची चर्चा आहे. शरद पवार गटासोबत सुरू असलेल्या वाटाघाटींना अजित पवार यांच्या निधनानंतर खंड पडल्याचे चित्र आहे. विशेषतः सुप्रिया सुळे यांच्याबाबत असंतोष असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे सध्या तरी विलीनीकरणाच्या चर्चांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे.
आजचा शपथविधी सोहळा राजभवनात पार पडणार असून, राज्यपाल आचार्य देवरत दुपारी चार वाजता मुंबईत दाखल होतील. शपथविधी सुमारे १० मिनिटांचा असणार असून, या कार्यक्रमाला मर्यादित प्रवेश ठेवण्यात आला आहे.शपथविधीपूर्वी सुनेत्रा पवार या त्यांच्या राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणार असून, तो राज्यसभेचे अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांच्याकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर दुपारी त्यांची विधिमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणून अधिकृत निवड होईल आणि संध्याकाळी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली जाईल.

