रांजणगाव गणपती : दुपारी झालेल्या भांडणाच्या कारणातून एका तरुणाच्या डोक्याच्या मागील बाजूस चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना रांजणगाव गणपती येथील सोन्या-सांगवी रोडवरील पार्किंगजवळ सोमवारी (दि. 14) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात दीपक कचरू खौसे (रा. लोहद्रा, ता. वरुड, जि. अमरावती) याच्याविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी झालेल्या भांडणाच्या कारणातून आरोपी दीपक खौसे याने शुभम गणेश पात्रे याच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात शुभमच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.याप्रकरणी संगमेश्वर विश्वनाथ बोबनाळे (वय 27, व्यवसाय चालक, रा. रांजणगाव गणपती) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 437/2026, भारतीय न्याय संहिता कलम 109 (1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक भापकर करीत आहेत. घटनास्थळी शिरूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले तसेच रांजणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी भेट देऊन पाहणी केली.

