Explore

Search

October 17, 2026 4:52 am

जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर आशिष शेलारांची टीका; ‘आंदोलनात राजकारणाचा वास’ !

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला आज १७ वा दिवस आहे. जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने कूच करण्यासाठी निघाले असून, त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने समर्थक सहभागी झाले आहेत. गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईत दाखल होण्याच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे राजकीय शक्ती असल्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी जरांगे यांच्या आंदोलनावर थेट भाष्य केले आहे. “जरांगे यांच्या आंदोलनात राजकारणाचा वास येतो,” असे विधान शेलार यांनी केले.

‘आधीच्या सरकारांनी काय केलं?’ असा शेलारांचा सवाल

पत्रकार परिषदेत बोलताना आशिष शेलार यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख केला. मराठा समाजासाठी एसीबीसी आरक्षणापासून विविध निर्णय महायुती सरकारने घेतले असल्याचा दावा त्यांनी केला.

“मराठा समाजासाठी ओबीसींच्या धर्तीवर सर्वाधिक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारने घेतले. यापूर्वीच्या सरकारांनी आरक्षण टिकवण्यासाठी काय केले, याचाही विचार झाला पाहिजे,” असे शेलार म्हणाले.

मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयीन प्रक्रियेसह विविध बाबींवर सरकारकडून काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘जरांगेंच्या भूमिकेमुळे संशय निर्माण होतो’

“शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह यापूर्वी राज्यात अनेक मुख्यमंत्री झाले. त्यांनी मराठा समाजासाठी काय केले, यावर जरांगे पाटील बोलतात का? मात्र फडणवीस आणि शिंदे यांच्या सरकारने मराठा समाजासाठी अनेक निर्णय घेतल्यानंतरही त्यांच्यावरच टीका केली जाते,” असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला.

यामुळेच जरांगे यांच्या भूमिकेबाबत लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होत असल्याचे शेलार म्हणाले. “जरांगे यांच्या मागे कोणता राजकीय नेता आहे की नाही, याची मला माहिती नाही. मात्र अशी चर्चा लोकांमध्ये आहे. त्यामुळे आता जरांगे पाटील यांनीच याबाबत स्पष्ट भूमिका मांडावी,” असे शेलार यांनी सांगितले.

शशिकांत शिंदेंनाही प्रत्युत्तर

जरांगे पाटील यांचे आंदोलन हाताळण्यात सरकार अपयशी ठरल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली होती. त्यावरही शेलार यांनी प्रत्युत्तर दिले.

“शशिकांत शिंदे यांच्या पक्षाचे मुख्यमंत्री राज्यात होते. शरद पवारही मुख्यमंत्री होते. त्या काळात मराठा समाजासाठी काय निर्णय घेण्यात आले, याचे उत्तर आधी त्यांनी द्यावे. त्यानंतर सरकारच्या यश-अपयशावर बोलावे,” असे शेलार म्हणाले.

‘आंदोलन करण्याचा अधिकार आहे’

जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांना आंदोलन करण्याचा अधिकार असल्याचेही शेलार यांनी स्पष्ट केले. “आंदोलनासाठी अर्ज करणे हा त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनाही आंदोलन करण्याचा अधिकार आहे. न्यायालयात जायचे असल्यास ते जाऊ शकतात. मात्र परवानगी द्यायची की नाही, हा पोलिसांचा विषय आहे. त्यावर मी भाष्य करणार नाही,” असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, मुंबईच्या दिशेने सुरू असलेल्या जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकार आणि आंदोलक यांच्यातील पुढील भूमिका काय असेल, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर