रांजणगाव : घरात ठेवलेली तब्बल 3 लाख 50 हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना गणेगाव खालसा (ता. शिरूर) येथे घडली आहे. याप्रकरणी रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 ऑगस्ट 2026 रोजी पहाटे 3 वाजल्यापासून 22 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंतच्या कालावधीत गणेगाव खालसा-वरुडे रोडवरील सरकारी तलावाशेजारी ही चोरी झाली. फिर्यादी हे जत्रेत खेळण्याचा पाळणा चालविण्याचा व्यवसाय करतात. फिर्यादी यांनी घरातील पत्र्याच्या पेटीत पिवळ्या पिशवीमध्ये 3 लाख 50 हजार रुपये रोख रक्कम ठेवली होती. यामध्ये 200 रुपयांच्या 1 हजार नोटा म्हणजे 2 लाख रुपये, 100 रुपयांच्या 1 हजार नोटा म्हणजे 1 लाख रुपये आणि 500 रुपयांच्या 100 नोटा म्हणजे 50 हजार रुपये, अशा एकूण 3 लाख 50 हजार रुपयांचा समावेश होता. फिर्यादी घरात नसताना अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश करून पत्र्याच्या पेटीत ठेवलेली रोकड चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 391/2026 नुसार भारतीय न्याय संहितेतील कलम 305(a), 331(4) आणि 331(6) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड करीत आहेत. अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

