कानपूर : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे जाहीरपणे आभार मानले आहेत. बिहारमधून निवडून आलेल्या पक्षाच्या पाच आमदारांनी गडकरींची भेट घेतल्यानंतर त्यांनी तब्बल 45 मिनिटे आमदारांचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्यांच्या मतदारसंघातील विकासकामांबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याचा दावा ओवैसी यांनी केला.
ओवैसी रविवारी कानपूर दौऱ्यावर होते. यावेळी बोलताना त्यांनी गडकरींसोबत झालेल्या भेटीचा प्रसंग सांगितला. ते म्हणाले, “बिहारमध्ये आमचे पाच आमदार निवडून आले आहेत. निवडून आल्यानंतर त्यांनी नितीन गडकरी यांची भेट घेतली. गडकरी यांनी जवळपास 45 मिनिटे बसून आमच्या पाचही आमदारांचे म्हणणे ऐकून घेतले.”
या भेटीत जुन्या पुलांची दुरुस्ती, अंडरपास तसेच इतर पायाभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांवर चर्चा झाल्याचे ओवैसी यांनी सांगितले. त्यानंतर आपण गडकरींना संबंधित कामे सुरू करण्यासाठी अधिकाऱ्यांना फोन करण्याची विनंती केली. त्यावर गडकरी यांनी तत्काळ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कामे लवकर सुरू करण्याच्या सूचना दिल्याचे ओवैसी यांनी सांगितले.
गडकरी यांनी अधिकाऱ्यांशी बोलताना “मजलिसवाले माझ्या घरी येऊन बसले आहेत,” असे म्हटल्याचेही ओवैसी यांनी सांगितले. या प्रसंगाचा उल्लेख करत त्यांनी गडकरींचे आभार मानले.
‘यावेळची निवडणूक वेगळी आणि आव्हानात्मक’
दरम्यान, ओवैसी यांनी उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपवर टीका केली. यावेळची विधानसभा निवडणूक 2014, 2017, 2019 आणि 2022 मधील निवडणुकांपेक्षा वेगळी असेल, असा दावा त्यांनी केला.
भाजपने दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्याचा आरोपही ओवैसी यांनी केला. तसेच उत्तर प्रदेशातील सत्ताकारणावर भाष्य करताना त्यांनी समाजवादी पक्षाच्या काळात यादव समाजाच्या वर्चस्वाची चर्चा होत होती, तर आता ठाकूर समाजाच्या वर्चस्वाची चर्चा होत असल्याचे म्हटले.
राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरही ओवैसी यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, उत्तर प्रदेशात कायद्याचे उल्लंघन होत असून सरकारच्या कारभाराबाबतही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
‘गरीबांच्या जमिनी बळकावल्या’
भाजपच्या सत्ताकाळात गरीबांच्या जमिनी बळकावल्या गेल्याचा आरोपही ओवैसी यांनी केला. राज्यातील विकास, वीज आणि कायदा-सुव्यवस्था हे आगामी निवडणुकीतील महत्त्वाचे मुद्दे ठरतील, असे त्यांनी म्हटले.
उत्तर प्रदेशातील गुंडगिरीच्या मुद्द्यावरूनही त्यांनी सरकारवर टीका केली. समाजवादी पक्षाच्या सरकारच्या काळात एका प्रकारची गुंडगिरी होती, तर सध्याच्या योगी आदित्यनाथ सरकारच्या काळात वेगळ्या स्वरूपाची गुंडगिरी असल्याचा दावा त्यांनी केला.
राम मंदिराशी संबंधित कथित गैरव्यवहाराच्या एसआयटी अहवालाचा मुद्दाही ओवैसी यांनी उपस्थित केला. हा अहवाल सार्वजनिक का केला जात नाही, तसेच संबंधित प्रकरणांतील आरोपींना जामीन कसा मिळत आहे, असा सवाल त्यांनी केला. आगामी विधानसभा निवडणुकीत हे मुद्दे चर्चेत राहतील, असेही ओवैसी यांनी सांगितले.
दरम्यान, असदुद्दीन ओवैसी यांनी नितीन गडकरी यांचे जाहीरपणे आभार मानल्याने या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

