शेवगाव : तालुक्यात सुरू असलेल्या अवैध देशी-विदेशी दारू विक्रीविरोधात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली. २२ सप्टेंबर रोजी शेवगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार ठिकाणी छापे टाकून पोलिसांनी पाच जणांविरुद्ध चार स्वतंत्र गुन्हे दाखल केले. या कारवाईत एकूण १३ हजार ५६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने शेवगाव परिसरात अवैध दारू विक्रीबाबत माहिती घेऊन कारवाई केली. दहिगाव येथील शिवनाथ रामदास गुंजाळ (वय ३२) याच्याकडून ८ हजार ९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दहिगाव येथील रणजीत भाऊराव मांढरे (वय ३५) आणि रांजणी येथील जनाबाई अशोक करंजे यांच्याविरुद्ध १ हजार ८०० रुपयांच्या मुद्देमालाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील जनाबाई करंजे फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दहिगाव येथील दगडू रोबन ससाणे (वय ४२) याच्याकडून २ हजार ९५० रुपयांचा, तर भायेगाव येथील शामराव गंगा शिंदे (वय ६०) याच्याकडून ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या सर्व प्रकरणांत महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये शेवगाव पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.

