Explore

Search

October 17, 2026 4:52 am

दादांचा आवाज… आठवणींचा पूर अन् जय पवारांच्या डोळ्यांत अश्रू; आंबेगावातील भावुक प्रसंग !

आंबेगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते जय अजितदादा पवार यांनी आज आंबेगाव येथे कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर ‘अजित सृष्टी’ या देखाव्याला भेट दिली. मात्र, या भेटीदरम्यान वडील दिवंगत अजितदादा पवार यांच्या आवाजातील जुने भाषण कानावर पडताच जय पवार यांना आपल्या भावना आवरता आल्या नाहीत. काही क्षणांतच त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले आणि भावनांचा बांध फुटला. या प्रसंगाने उपस्थितांचेही मन हेलावून गेले.

युवराज बेलदरे यांनी आपल्या गणपतीसमोर दिवंगत अजितदादा पवार यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करण्यासाठी ‘अजित सृष्टी’ हा भावपूर्ण देखावा उभारला आहे. अजितदादांच्या कार्याचा, त्यांच्या सार्वजनिक जीवनातील योगदानाचा आणि आठवणींचा जागर या देखाव्याच्या माध्यमातून करण्यात आला आहे.जय पवार देखाव्याच्या ठिकाणी पोहोचले, त्यावेळी तेथे अजितदादांच्या आवाजातील जुने भाषण सुरू होते. अचानक कानावर पडलेला तो परिचित आवाज जय पवार यांना काही क्षण भूतकाळात घेऊन गेला. “आई अजून रडत असते का? तिला सांगा रडू नको म्हणून…” हे शब्द ऐकताच जय पवार यांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले.

वडिलांचा आवाज समोर नसला, तरी ध्वनिफितीतून ऐकू येणाऱ्या त्या आवाजाने आठवणींचा जणू पटच त्यांच्या डोळ्यांसमोर उभा राहिला. जय पवार काही क्षण स्तब्ध झाले. हुंदका आवरताना त्यांनी डोळे पुसले. त्यानंतर भावुक वातावरणात गणपतीची आरती केली.या प्रसंगाने उपस्थित कार्यकर्त्यांनाही गहिवरून आले. ‘अजित सृष्टी’ पाहण्यासाठी आलेल्या जय पवार यांच्यासाठी हा केवळ एका देखाव्याचा दौरा नव्हता; तर वडिलांच्या आठवणींना पुन्हा एकदा स्पर्श करून जाणारा भावनिक क्षण ठरला.

शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचे सुनेत्रा पवार यांचे निर्देश…..!

दरम्यान, राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी पक्षातील मंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार, माजी आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष नुकसानाची पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत. नैसर्गिक संकटाच्या काळात शेतकऱ्यांना एकटे सोडू नका. त्यांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घ्या, नुकसानग्रस्त भागांची पाहणी करा आणि आवश्यक प्रशासकीय मदत मिळवून देण्यासाठी तत्परतेने पाठपुरावा करा, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.“शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ता त्यांच्या सोबत आहे,” हा विश्वास निर्माण करण्याचे आवाहनही सुनेत्रा पवार यांनी केले आहे.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर