Explore

Search

October 17, 2026 3:27 am

संजय राऊतांच्या वक्तव्यावर राम कदम आक्रमक; ‘संसद रखेल वाटत असेल तर राजीनामा द्या’ !

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी संसद आणि केंद्रीय निवडणूक आयोगाबाबत केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. राऊत यांनी संसदेसंदर्भात ‘रखेल’ हा शब्दप्रयोग केल्याने भाजपकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. भाजप आमदार राम कदम यांनी राऊतांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत थेट त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

राम कदम यांनी म्हटले की, संसदेला ‘रखेल’ म्हणणे हा संविधानाचा आणि संसदीय व्यवस्थेचा अपमान आहे. भारतीय संसद ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या चौकटीत कार्यरत आहे. त्यामुळे अशा प्रकारची भाषा वापरणे योग्य नाही, असा दावा त्यांनी केला.“संजय राऊत संसदेला रखेल म्हणत आहेत. ‘रखेल’ या शब्दाचा अर्थ काय होतो, याची जाणीव त्यांना आहे का? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानातून ही संसद उभी राहिली आहे. त्यामुळे तुम्ही संविधानाचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत आहात,” अशी टीका राम कदम यांनी केली.याचवेळी राम कदम यांनी राऊतांना थेट सवाल केला. “तुमच्या दृष्टीने संसद जर रखेल असेल, तर आजच्या आज राज्यसभा खासदारकीचा राजीनामा द्या,” अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, संजय राऊत यांनी संसदेत उपस्थित केलेल्या मुद्द्यांवरूनही भाष्य केले. संसदेत मुद्दे उपस्थित करून त्याचा अपेक्षित परिणाम होत नसल्याचा दावा करत त्यांनी संसद काही व्यक्तींच्या नियंत्रणाखाली असल्याची टीका केली होती. याचवेळी त्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा उल्लेख करत संसदेसंदर्भात आक्षेपार्ह शब्दप्रयोग केला.राऊतांच्या या वक्तव्यानंतर भाजप नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजप प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनीही ‘एक्स’वर पोस्ट करत राऊतांवर निशाणा साधला. त्यांनी राऊतांच्या वक्तव्यावरून भारतीय संसद आणि लोकशाहीचा अपमान झाल्याचा आरोप केला.

या वक्तव्यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नवा राजकीय वाद निर्माण झाला असून, संजय राऊत यांच्या विधानावरून भाजपकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी पुढे आली आहे.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर