Explore

Search

October 17, 2026 5:27 am

हातकणंगलेत रेल्वेच्या धडकेत १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू !

रेल्वे रुळावरून चालताना धनबाद एक्स्प्रेसची धडक; कानात इयरफोन असल्याने मागून येणाऱ्या रेल्वेचा अंदाज न आल्याची प्राथमिक माहिती !

हातकणंगले तालुका (प्रतिनिधी : रईस मुजावर) : रेल्वे रुळावरून चालत असताना मागून आलेल्या धनबाद एक्स्प्रेसची धडक बसून १७ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. २३) सकाळी हातकणंगले येथे घडली. अनुष्का संतोष पोवार (वय १७, रा. वेताळपेठ, गल्ली नं. ३, इचलकरंजी) असे मृत तरुणीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी पावणेबाराच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहासमोरील रेल्वे रुळावरून अनुष्का तिच्या दोन मैत्रिणींसोबत चालत जात होती. त्यावेळी अनुष्काच्या कानात इयरफोन होते. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या धनबाद एक्स्प्रेसचा तिला अंदाज आला नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

रेल्वे जवळ येत असल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या मैत्रिणींनी अनुष्काला आवाज देऊन सावध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कानात इयरफोन असल्याने तिला त्यांचा आवाज ऐकू आला नाही. मैत्रिणींनी तिला वाचवण्यासाठी धाव घेतली; मात्र काही क्षणांतच धनबाद एक्स्प्रेसची अनुष्काला जोरदार धडक बसली.या अपघातात अनुष्का गंभीर जखमी झाली. घटनेनंतर तिला तातडीने हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकारी जगवाणी यांनी तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केले.घटनेची माहिती मिळताच हातकणंगले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला व प्राथमिक तपास सुरू केला. या प्रकरणी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी जगवाणी यांनी हातकणंगले पोलिसांत फिर्याद दिली आहे. घटनेचा पुढील तपास हातकणंगले पोलीस करीत आहेत.

अनुष्काच्या पश्चात आई-वडील, आजी-आजोबा, भाऊ, बहीण, काका-काकी आणि आत्या असा परिवार आहे. अवघ्या १७व्या वर्षी झालेल्या या दुर्दैवी मृत्यूमुळे पोवार कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर