Explore

Search

October 17, 2026 5:29 am

पिंपळगाव कौडा खून प्रकरणातील फरार आरोपी कल्याण रेल्वे स्थानकावर जेरबंद

अहिल्यानगर : पिंपळगाव कौडा येथे झालेल्या खून प्रकरणातील फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कल्याण रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेतले. हरीष गुलाब काळे (वय ३०, रा. पिंपळगाव कौडा, ता. अहिल्यानगर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पिंपळगाव कौडा येथे हरीष काळे याच्या घरी भांडण सुरू होते. हे भांडण सोडविण्यासाठी विक्रम रोहिदास भोसले आणि त्यांचा भाऊ किरण रोहिदास भोसले तेथे गेले होते. यावेळी भांडण सोडविण्याच्या कारणावरून हरीष काळे याने किरण भोसले यांच्या चेहरा, छाती आणि पोटावर लोखंडी कत्तीने वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात किरण भोसले यांचा मृत्यू झाला.या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८३२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), ३५२ आणि ३५१(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. खुनाची माहिती मिळताच पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीच्या शोधासाठी स्वतंत्र पथक तयार केले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून गोपनीय माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला.

दरम्यान, आरोपी श्रीगोंदा, दौंड, पुणे आणि मुंबई परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र, तो वारंवार आपले ठिकाण बदलत असल्याने पोलिसांसमोर त्याला पकडण्याचे आव्हान होते.

अखेर २३ सप्टेंबर रोजी हरीष काळे हा कल्याण रेल्वे स्थानक परिसरात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने कल्याण रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून हरीष काळे याला ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या आरोपीला पुढील तपासासाठी नगर तालुका पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास नगर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे तसेच पोलीस अंमलदार फुरकान शेख, शामसुंदर जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, रोहित मिसाळ, प्रताप देवकाते, दीपक जाधव आणि अरुण मोरे यांच्या पथकाने केली.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर