Explore

Search

October 17, 2026 5:01 am

दारूधंद्याविरोधात तक्रार केल्याच्या रागातून तरुणाला बेदम मारहाण; आठ जणांवर गुन्हा !

जेजुरी (ता. पुरंदर) : दारूधंद्याविषयी पोलिसांकडे तक्रार करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याच्या रागातून आठ जणांच्या टोळक्याने पिसे येथील शेतकरी संतोष राजाराम मुळीक (वय ३६) यांना हॉकी स्टिक आणि दगडाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या मारहाणीत मुळीक यांच्या पायाचे हाड फ्रॅक्चर झाले असून डोक्याला तसेच पायाला दुखापत झाली आहे. याप्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना १ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास पिसे येथे घडली. संतोष मुळीक हे आपल्या घरासमोर गुरांना पाणी पाजत असताना तीन मोटारसायकलींवरून आलेल्या आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींपैकी शिवा राठोड याने गलोलीने मुळीक यांच्या छातीवर दगड मारला. त्यानंतर सनी राठोड, राज राठोड आणि रोहन राठोड यांनी हॉकी स्टिकने मुळीक यांच्या पाठीवर, मांडीवर, हातावर आणि डोक्यावर मारहाण केली. इतर आरोपींनीही त्यांना हाताने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या हल्ल्यात मुळीक यांच्या उजव्या पायाच्या नडगीला दोन टाके पडले असून पायाच्या पंजाचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. तसेच डोक्यालाही एक टाका पडला आहे. मारहाण करताना आरोपींनी मुळीक यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी शिवा राठोड व मारुती राठोड (दोघे रा. पारगाव मेमाणे), सनी राठोड, राज राठोड व रोहन राठोड (रा. नाझरे क.प.), पोपी राठोड व बलराम राठोड (रा. राजेवाडी) आणि मनोहर इंगळे (रा. खोपडेवाडी, पिसे) या आठ जणांविरुद्ध जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात पोलिसांनी लावलेल्या कायदेशीर तरतुदींनुसार मारहाण करून दुखापत करणे, गंभीर दुखापत करणे, शिवीगाळ व दमदाटी करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, बेकायदेशीर जमाव करून हल्ला करणे तसेच सामूहिकरित्या गुन्हा करणे अशा स्वरूपाचे आरोप आहेत.

यामध्ये दुखापत करण्यासंदर्भातील तरतुदी, गंभीर दुखापत करण्याचा प्रयत्न/कृत्य, जाणूनबुजून दुखापत करणे, शांतता भंग होईल अशा प्रकारे अपमान किंवा शिवीगाळ करणे, धमकी देणे, बेकायदेशीर जमाव आणि त्या जमावातील सदस्यांनी सामूहिक उद्देशाने केलेल्या कृत्याची जबाबदारी यांचा समावेश आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार राऊत करीत आहेत.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर