Explore

Search

October 17, 2026 5:02 am

विहिरीवरील मोटारीच्या वादातून भाऊ-पुतण्यांकडून मारहाण; तिघे जखमी !

उरुळी कांचन : विहिरीवरील मोटार सुरू करण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. सख्खा भाऊ आणि दोन पुतण्यांनी शेतकरी, त्याचा भाऊ आणि मुलाला काठी, प्लास्टिकच्या पाईपने तसेच दगडाने मारहाण केल्याची घटना पेठ (ता. हवेली) येथे २० सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा ते अकराच्या दरम्यान घडली. या घटनेत तिघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी संतोष साहेबराव गायकवाड (वय ४९, रा. पेठ) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार, विहिरीवरील मोटार सुरू करण्याच्या कारणावरून वाद झाला. त्यावेळी पुतण्या सचिन विलास गायकवाड याने संतोष गायकवाड यांच्या डोक्यात लाकडी काठीने मारहाण केली. तसेच शुभम विलास गायकवाड याने प्लास्टिकच्या पाईपने आणि हाताने मारहाण केली.भांडण सोडवण्यासाठी आलेल्या कांतीलाल यांच्या डोक्यात सचिन याने काठी मारल्याने ते जखमी झाले. तसेच संतोष यांचा मुलगा श्रेयश हा भांडण सोडवण्यासाठी मध्ये आला असता त्याच्या छातीवर व हातावर काठीने मारहाण करण्यात आली. यावेळी विलास साहेबराव गायकवाड याने दगडाने श्रेयशच्या डोक्यात मारल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी विलास साहेबराव गायकवाड, सचिन विलास गायकवाड आणि शुभम विलास गायकवाड (सर्व रा. पेठ) यांच्याविरुद्ध मारहाण, दुखापत करणे, शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार गाडेकर करीत आहेत.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर