“एक स्वास्थ्य, एक भविष्य” संकल्पनेवर परिसंवाद; ‘मेरा आयुर वृक्ष’ उपक्रमाने दिला निसर्ग संवर्धनाचा संदेश
रिसोड ( तालुका प्रतिनिधी रामेश्वर रंजवे ) : दि आर्य शिक्षण संस्था संचलित सनराईज इंग्लिश स्कूल, रिसोड येथे २३ सप्टेंबर रोजी ११ वा आयुर्वेद दिन अत्यंत उत्साहात आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. यावर्षी हा सोहळा “एक स्वास्थ्य, एक भविष्य: पुराव्यांवर आधारित सायन्स, नाविन्यता आणि सर्वंगीण काळजीद्वारे आयुर्वेदाचे एकत्रीकरण” (One Health, One Future: Integrating Ayurveda Science through Evidence, Innovation, and Holistic Care) या संकल्पनेवर आयोजित करण्यात आला होता.
विद्यार्थ्यांसाठी माहितीपूर्ण परिसंवाद..
आयुर्वेद दिनाचे औचित्य साधून इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी एका विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. निरोगी जीवनशैलीसाठी आयुर्वेदाचे महत्त्व, वैज्ञानिक पुरावे, आधुनिक तंत्रज्ञान आणि सर्वंगीण आरोग्य सेवेची सांगड कशी घालावी, याबाबत विद्यार्थ्यांना जागरूक करणे हा या परिसंवादाचा मुख्य उद्देश होता.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन व अध्यक्षांचे विचार..
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या डॉ. साक्षी परिहार आणि कु. रोशनी सरनाईक यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आयुर्वेदाची महती विशद केली. दैनंदिन जीवनात निरोगी राहण्यासाठी आयुर्वेदाचा दृष्टिकोन कसा उपयुक्त ठरतो, याविषयी त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रम प्रसंगी शाळेच्या प्राचार्या सौ. रोज मेरी जोस यांनी अध्यक्षस्थान भूषवले. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात या उपक्रमाचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना भारताच्या समृद्ध आयुर्वेदिक वारशाचा अभ्यासपूर्ण अंगीकार करण्याचे आवाहन केले.

‘मेरा आयुर वृक्ष’ अंतर्गत वृक्षारोपण…
आयुर्वेद दिनाचे खास वैशिष्ट्य म्हणजे “मेरा आयुर वृक्ष” या संकल्पनेअंतर्गत राबवण्यात आलेली वृक्षारोपण मोहीम. औषधी वनस्पती, निसर्ग, पर्यावरण आणि मानवी आरोग्य यांच्यातील अतूट संबंधांवर या वेळी भर देण्यात आला. विद्यार्थ्यांनी यात हिरिरीने भाग घेऊन “झाडे लावा, भविष्य वाचवा” असा संदेश दिला.
या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा सौ. जयश्रीताई देशमुख, सचिव श्री. नकुल दादा देशमुख आणि विश्वस्त श्री. चैतन्य भैया देशमुख यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन इयत्ता नववीच्या विद्यार्थिनी कुमारी गौरी नागरे आणि कुमारी सृष्टी शिंदे यांनी कुशलतेने केले.

