शिरूर : आजारी आईला दररोज दवाखान्यात ने-आण करण्यासाठी काही दिवसांसाठी विश्वासाने दिलेली चारचाकी कार परत न करता तिचा अपहार केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रांजणगाव सांडस, ता. शिरूर येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश बबन सोनवणे (वय 35, रा. रांजणगाव सांडस, ता. शिरूर) यांनी त्यांचा मित्र राजेश पंडीत रावडे (रा. वाघोली, ता. हवेली) याला त्याची आई आजारी असल्याने उपचारासाठी दवाखान्यात ने-आण करण्यासाठी काही दिवस चारचाकी वाहनाची गरज असल्याचे सांगितल्याने विश्वासाने आपली आय-10 कार (क्रमांक एमएच 12 टीडी 5039) वापरण्यास दिली होती.
दिनांक 2 जून 2026 रोजी सकाळी सुमारे 11 वाजता वाहन आरोपीच्या ताब्यात देण्यात आले होते. मात्र, ठरल्याप्रमाणे वाहन परत करण्याऐवजी आरोपीने कार परत न करता तिचा अपहार करून निघून गेल्याची तक्रार फिर्यादीने पोलिसांकडे केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार शिंदे करीत आहेत.

