Explore

Search

October 17, 2026 4:12 am

पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत तिढा; भाजपचा दोन्ही जागांवर दावा, शिंदे गटाचीही तयारी !

पुणे : पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीवरून महायुतीतील जागावाटपाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दोन्ही मतदारसंघांवर भाजपचा दावा असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केल्याने महायुतीतील घटक पक्षांमध्ये या जागांवरून रस्सीखेच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या जागा परंपरागतपणे भाजपच्या राहिल्या असून, दोन्ही जागांवर भाजपचा दावा असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. मात्र, महायुती म्हणूनच दोन्ही मतदारसंघांत निवडणूक लढवण्याचा प्रयत्न असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करून जागावाटपाबाबत अंतिम निर्णय घेतील. नेतृत्वाकडून जो निर्णय घेतला जाईल, तो आम्हाला मान्य असेल, अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी मांडली. ते सांगली येथे बोलत होते.दरम्यान, पुणे शिक्षक मतदारसंघातून उमेदवारीसाठी शिवसेना शिंदे गटाकडूनही जोरदार तयारी सुरू असल्याचे चित्र आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आरोग्य कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे हे शिक्षक मतदारसंघातून इच्छुक असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचेही सांगितले जात आहे.

दुसरीकडे, पुणे पदवीधर मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानेही दावा केला आहे. त्यामुळे एकाच वेळी पदवीधर मतदारसंघावर राष्ट्रवादीचा आणि शिक्षक मतदारसंघावर शिवसेना शिंदे गटाचा दावा असल्याने भाजपसमोर जागावाटपाचा प्रश्न निर्माण झाला आहे.याआधी भाजपचे नेते आणि मंत्री जयकुमार गोरे यांनीही पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघावर भाजपचा दावा असल्याचे संकेत दिले होते. महायुती म्हणून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न असेल; मात्र आवश्यकता भासल्यास भाजप स्वतंत्रपणेही लढू शकतो, असा सूचक इशारा त्यांनी दिला होता.

त्यामुळे आगामी पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीतील जागावाटपाचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. भाजप दोन्ही जागांवरील आपला दावा कायम ठेवतो की घटक पक्षांना यातील एखादी जागा सोडतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर