पुणे : हवेली तालुक्यातील कोलवडी येथे उद्योजक सचिन लोणकर यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गजानन गायकवाड आणि आकाश अडसुळे या दोघांनी लोणकर यांच्यावर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात सचिन लोणकर गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे कोलवडी परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, सचिन लोणकर हे कोलवडी परिसरातील उद्योजक असून त्यांच्यावर दोघांनी अचानक हल्ला केला. हल्ल्यात लोणकर यांना गंभीर दुखापत झाली. हल्ल्यानंतर गजानन गायकवाड आणि आकाश अडसुळे हे दोघेही घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मदत करण्यासाठी धाव घेतली. त्यानंतर जखमी लोणकर यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, हल्लेखोरांनी सचिन लोणकर यांच्या वाहनाचीही तोडफोड केल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण प्रकाराचे काही महत्त्वाचे पुरावे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाले आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून हल्ल्यात सहभागी असलेल्या व्यक्तींची माहिती मिळवण्याचे काम सुरू आहे. हल्ल्याच्या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाल्याने पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून उपलब्ध पुरावे संकलित करण्यास सुरुवात केली आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे हल्ल्याची नेमकी परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.सचिन लोणकर यांच्यावर हल्ला करण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वैयक्तिक वाद, व्यावसायिक कारण किंवा अन्य कोणत्या कारणातून हा हल्ला झाला आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. हल्ल्यापूर्वी आरोपी आणि लोणकर यांच्यामध्ये काही वाद झाला होता का, तसेच या हल्ल्यामागे आणखी कोणी व्यक्ती सहभागी आहे का, याचाही तपास केला जात आहे.
दरम्यान, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी लोणीकंद पोलिसांकडून विविध पातळ्यांवर तपास सुरू करण्यात आला आहे. आरोपींच्या संभाव्य ठिकाणांची माहिती घेऊन त्यांचा माग काढण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास लोणीकंद पोलीस करत असून, तपासातून हल्ल्यामागील नेमके कारण आणि घटनेचे संपूर्ण वास्तव समोर येण्याची शक्यता आहे.

