शिरूर ( प्रतिनिधि ) : टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील पोलिस दूरक्षेत्रातील दोन हवालदारांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) एकाच दिवशी कारवाई केल्याने शिरूर पोलिस दलात खळबळ उडाली आहे. एका प्रकरणात हवालदार शिवाजी बनकर याला ११ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले, तर दुसऱ्या प्रकरणातील हवालदार सतीश मुंढे हा ९५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर रकमेसह पसार झाल्याची माहिती समोर आली आहे.टाकळी हाजी परिसरातील एकाच कुटुंबाशी संबंधित जमिनीच्या वादातून दोन स्वतंत्र तक्रारी शिरूर पोलिस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. या दोन्ही प्रकरणांचा तपास हवालदार शिवाजी बनकर आणि सतीश मुंढे यांच्याकडे होता. संबंधित तक्रारदारांकडून दोन्ही हवालदारांनी लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.
एका प्रकरणात आरोपींना अटक न करता नोटीस देण्यासाठी तसेच प्रकरणात मदत करण्याच्या मोबदल्यात हवालदार बनकर याने १५ हजार रुपयांची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. यापूर्वी त्याने ५ हजार रुपये स्वीकारल्याचेही समोर आले. २९ सप्टेंबर रोजी एसीबीने लाच मागणीची पडताळणी केली.त्यानंतर ३० सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास शिरूर येथील जुन्या पोलिस ठाण्याबाहेर उर्वरित ११ हजार रुपये स्वीकारताना बनकर याला एसीबीच्या पथकाने पंचांसमक्ष रंगेहाथ पकडले.
दुसऱ्या प्रकरणात हवालदार सतीश मुंढे याने कारवाई टाळण्यासाठी सुरुवातीला एक लाख रुपयांची मागणी केल्याचे समोर आले. तडजोडीनंतर ही रक्कम ९५ हजार रुपये ठरल्याची माहिती आहे. त्यानुसार एसीबीने सापळा रचला.टाकळी हाजी पोलिस चौकीत ९५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर एसीबीच्या कारवाईची चाहूल लागताच मुंढे हा लाचेच्या रकमेसह पसार झाला. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.या दोन्ही कारवायांमुळे शिरूर पोलिस दलात खळबळ उडाली असून, संबंधित प्रकरणांचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.
पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक अजित पाटील आणि उपअधीक्षक सतीश वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. मुंढे प्रकरणात पोलिस निरीक्षक शैलजा शिंदे, तर बनकर प्रकरणात पोलिस निरीक्षक आसावरी शेडगे यांनी सापळा कारवाई केली.

