रांजणगाव : रांजणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल झालेल्या जबरी चोरीच्या दोन गुन्ह्यांची उकल करण्यात रांजणगाव पोलिसांना यश आले. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी बिहारमधील दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुमारे चार तोळे सोन्याचे दागिने तसेच मोटारसायकल असा एकूण ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
रांजणगाव पोलीस ठाणे हद्दीत जबरी चोरीच्या घटना घडल्यानंतर अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली. गुन्ह्यांच्या घटनास्थळांची पाहणी करून गुन्ह्यांची वेळ, कार्यपद्धती आणि घटनांमध्ये असलेले साम्य यांचा आढावा घेण्यात आला. तसेच तांत्रिक विश्लेषणासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली.पोलिसांनी घटनास्थळापासून रस्त्यालगत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. फुटेजमधील उपलब्ध माहितीचे तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर तसेच गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयितांची ओळख पटविण्यात आली.
त्यानुसार मोहम्मद इम्तियाज गयासुद्दिन शेख आणि मोहम्मद परवेज शाहबाज आलम, दोघेही रा. तुलसीपूर, जमुनिया, ता. जमुनिया, जि. भागलपूर, बिहार, यांना ताब्यात घेण्यात आले.आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी रांजणगाव पोलीस ठाणे गु.र.नं. ३४८/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०४(२), ३(५) तसेच आळकाटा पोलीस ठाणे गु.र.नं. २४६/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०४, ३(५) या दोन गुन्ह्यांची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.आरोपींकडून सुमारे चार तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि मोटारसायकल असा ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, पुणे विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भासले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मेहेर डोंगरे, तसेच सफौ/संजीव पचाळ, पोलीस नाईक/कुमार पंधारे, पोलीस नाईक/आनंद शेळके, पोलीस नाईक/संजय जाधव, पोलीस/राजू मोमीन, पोलीस/विकास पाटील, पोलीस/समर धुमाळ आदींच्या पथकाने केली. रांजणगाव व आळकाटा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

