Explore

Search

October 17, 2026 4:13 am

तीर्थक्षेत्र, ऐतिहासिक स्थळांच्या विकासकामांना गती देण्याचे जिल्हाधिकारी डुडींचे निर्देश !

पुणे : जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रे, ऐतिहासिक वारसा स्थळे आणि पर्यटनस्थळांच्या विकासासाठी सुरू असलेल्या विविध कामांना गती देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी संबंधित विभागांना दिले. विकासकामांची सद्यःस्थिती, प्रगती, प्रशासकीय प्रक्रिया आणि कामे पूर्ण करण्याची निर्धारित कालमर्यादा यांचा त्यांनी आढावा घेतला. राजमाता सईबाई स्मृतीस्थळासाठी आवश्यक भूसंपादन आणि खरेदीखत प्रक्रियेचा यावेळी आढावा घेण्यात आला. तसेच राजमाता सईबाई स्मृतीस्थळ आणि संत जगनाडे महाराज स्मारकाच्या सुरू असलेल्या कामांची प्रगती तपासण्यात आली. ही कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

दरम्यान, सिंहगड आणि राजगड किल्ल्यांवरील पर्यटन सुविधांवरही बैठकीत चर्चा झाली. पर्यटकांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा, सुरू असलेली विकासकामे आणि संबंधित प्रशासकीय बाबींची माहिती अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली. किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक बाबींचा विचार करून विकासकामे राबविण्याचे निर्देश देण्यात आले.विकासकामांची गुणवत्ता आणि वेळेत पूर्तता याकडे संबंधित विभागांनी विशेष लक्ष द्यावे, असे डुडी यांनी स्पष्ट केले. कामांमध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई होऊ नये यासाठी सार्वजनिक बांधकाम, वन, पुरातत्त्व आणि पर्यटन विभागांनी परस्पर समन्वयाने कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

जिल्ह्यातील ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांच्या विकासासाठी विविध आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या कामांचा टप्पानिहाय आढावा घेऊन आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभाग, वनविभाग, पुरातत्त्व विभाग आणि पर्यटन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर