Explore

Search

October 17, 2026 3:26 am

MPSC विद्यार्थी आंदोलनावरून रोहित पवार आणि चित्रा वाघ आमनेसामने; आरोप-प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापले !

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. या आंदोलनावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या मुद्द्यावरून राजकीय संघर्ष तीव्र केला आहे. रोहित पवार यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका करत “राजकारणाची लाज वाटली पाहिजे”, अशा शब्दांत हल्लाबोल केला. आंदोलनात सहभागी असलेल्या विद्यार्थिनींची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांची परिस्थिती जाणून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहण्याऐवजी त्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे पवार यांनी म्हटले.

चित्रा वाघ यांचा पलटवार

रोहित पवार यांच्या आरोपांना चित्रा वाघ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.  “लाज आम्हाला नाही, तर विद्यार्थ्यांचा वापर करणाऱ्यांना वाटली पाहिजे,” असे म्हणत त्यांनी पवारांवर निशाणा साधला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नाचे श्रेय इतर कोणाला मिळाल्याने रोहित पवार यांचा अहंकार दुखावला असल्याचा आरोपही वाघ यांनी केला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर तोडगा निघाल्यानंतर आणि विद्यार्थी समाधानी असल्याचे चित्र असताना पुन्हा आंदोलन का केले जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

विद्यार्थ्यांच्या हिताचा अजेंडा नाही’

विद्यार्थ्यांचे आंदोलन मॅनेज झाल्याचे आरोप करून त्यांना पुन्हा रस्त्यावर उतरवणे तसेच आंदोलनात वादग्रस्त व्यक्तींना सहभागी करून घेणे, हा विद्यार्थ्यांच्या हिताचा अजेंडा नसल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटले. रोहित पवार यांनी केलेल्या वैयक्तिक आरोपांवरही वाघ यांनी आक्षेप घेतला. “पोरकट भाषा वापरून केलेली राजकीय स्टंटबाजी लपणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी पवारांवर पलटवार केला.

दरम्यान, एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू झालेल्या या आरोप-प्रत्यारोपांमुळे विद्यार्थ्यांच्या मूळ प्रश्नाबरोबरच हा मुद्दा आता राजकीय वादाचा केंद्रबिंदू बनला आहे.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर